दुर्गा महोत्सवातून देहदान व अवयवदानाचा संदेश

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा जनजागृतीपर उपक्रम यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने समाजात सामाजिक बांधिलकी, मानवता आणि सेवाभावाची जाणीव निर्माण करण्यासोबतच देहदान व अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यांच्या वतीने जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके आणि जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. उमेश जोगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी दुर्गा महोत्सवात सहभागी भाविकांना देहदान व अवयवदानाचे महत्त्व, त्यासंदर्भातील गैरसमज आणि अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना मिळू शकणारे जीवनदान याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच अवयवदानाचा संकल्प करू इच्छिणाऱ्या नागरिकांचे ऑनलाइन नोंदणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. अवयवदान हे मृत्यूनंतरही दुसऱ्याला जीवन देण्याचे महान कार्य आहे. किडनी, यकृत आणि हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या निकामी होण्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. अशा रुग्णांसाठी अवयवदान आशेचा किरण ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी अवयवदानाविषयी योग्य माहिती जाणून घेऊन या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे आणि समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करावा, असे आवाहन समाजसेवा विभागाचे नोडल अधिकारी रविंद्र निचळे यांनी केले. या उपक्रमादरम्यान उपस्थित भाविकांना अवयवदानाची प्रक्रिया, संमतीचे महत्त्व, अवयवदानासाठी पात्रता, मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींमधील अवयवदान तसेच यासंदर्भातील कायदेशीर तरतुदी आणि अधिकृत आरोग्य यंत्रणांची माहिती देण्यात आली. समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय अमर इमले, मोहन दुंगे, आशिष खडसे, आशिष दाहापुते, कबीर दरणे, भारती गायकवाड आणि कोमल चव्हाण यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून आनंद सांबरे यांनी योगदान दिले. धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून विविध दुर्गा महोत्सव मंडळांपर्यंत आणि त्यांच्याद्वारे जनतेपर्यंत देहदान व अवयवदानाचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या जनजागृती उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून, अनेक नागरिकांनी देहदान व अवयवदानाबाबत आपला संकल्प व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित