महाडीबीटी पोर्टल, शिष्यवृत्तीविषयी महिला महाविद्यालयात कार्यशाळा सहायक आयुक्त मंगला मून यांनी केले मार्गदर्शन

यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, दत्ता चौक, यवतमाळ येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कुटे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त मंगला मून उपस्थित होत्या. कार्यशाळेत अनुदानित महाविद्यालयांना महाडीबीटी पोर्टलद्वारे जमा होणारे शिक्षण शुल्क, महाडीबीटी २.० या नवीन प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये १०० टक्के पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देणे, शुल्क मान्यतेची (Fee Approval) सद्यस्थिती, सर्व अर्ज ३१ मार्च २०२७ पर्यंत मंजूर करून विद्यार्थ्यांना लाभ देणे, तसेच सन २०१९-२० पासून प्रलंबित असलेल्या अर्जांवर कार्यवाही करणे या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार महाडीबीटी प्रणालीचे अद्ययावत 'व्हर्जन २.०' कार्यान्वित करण्यात आले आहे. या नवीन प्रणालीवर अर्ज भरताना महाविद्यालयांना येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींबाबत सहायक आयुक्त मंगला मून यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयांच्या विविध समस्यांचा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून त्यांचे शक्य तितक्या लवकर निराकरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. या कार्यशाळेला यवतमाळ जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित