उत्पादकता वाढीसाठी जवस पिकाचे आधुनिक तंत्रज्ञानाने व्यवस्थापन करावे

> कृषी तज्ज्ञांचे शेतकऱ्यांना आवाहन यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : रब्बी हंगामात कमी खर्चात व थंड हवामानात अधिक नफा देणारे बहुगुणी तेलबिया पीक म्हणून जवसाची लागवड अत्यंत फायदेशीर ठरते. जवस पिकापासून अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जवस तेलामध्ये सुमारे ५८ टक्के ओमेगा-३, मेदाम्ल व अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल व मधुमेह नियंत्रण आणि कर्करोग प्रतिकारासाठी दररोज ६ ग्रॅम जवसाचा आहारात वापर करणे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जमिनीची निवड, पूर्वमशागत व पेरणी जवसाची लागवडीसाठी मध्यम ते भारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. प्रती हेक्टरी १० गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून वखराच्या दोन पाळ्या द्याव्यात. कोरडवाहू जमिनीवर ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर बागायती जमिनीवर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करावी. पेरणी पद्धतीनुसार चाड्याच्या तिफणीने ३० सेमी ओळीतील अंतर ठेवून १५ किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. सुधारित वाणांची निवड जवस पिकाच्या एनएल ९७ या वाणाचा कालावधी ११५ ते १२० दिवस असून तेलाचे प्रमाण ४४ टक्के आहे. त्यातून ६००–१२०० किलो प्रती हेक्टरी उत्पादन होवू शकते. पी.के.व्ही.-एनएल-२६० या वाणाचा कालावधी १०५–११४ दिवस, तेलाचे प्रमाण ३८ टक्के, उत्पादन ६००–१२०० (कोरडवाहू) व ९००–१८०० किलो प्रती हेक्टरी (ओलिताखाली) उत्पादन होवू शकते. जवसासोबत हरभरा, करडई किंवा मोहरीचे आंतरपीक घेता येते. बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझिम बुरशीनाशक लावावे किंवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा लावावे. बुरशीनाशकानंतर ३ तासांनी २० ग्रॅम ॲझोटोबॅक्टर + २० ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जिवाणू (PSB) प्रति किलो बियाण्यास चोळावे. खत व सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन कोरडवाहू जमिनीवरील पिकासाठी हेक्टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद (पेरणीवेळी ५४ किलो युरिया + १५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट + १५ किलो गंधक/हेक्टरी), तर बागायती जमिनीवरील पिकासाठी ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद (पेरणीवेळी ६५ किलो युरिया + १८७ किलो एसएसपी + १५ किलो गंधक आणि ४०–४५ दिवसांनी उरलेला ६५ किलो युरिया) द्यावे. पेरणीनंतर ४५ दिवसांनी ५ ग्रॅम प्रती लिटर झिंक सल्फेट + ५ ग्रॅम प्रती लिटर बोरॅक्सची फवारणी करावी. अंतरमशागत व तण व्यवस्थापन पहिले ३० दिवस पीक तणमुक्त ठेवावे. पेरणीनंतर २५ दिवसांनी डवरणी व ३० दिवसांनी निंदण करावे. पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी उगवणीनंतर २ ते ३ पानांच्या अवस्थेत क्लोडीनोफोप + मेटसल्फुरॉन मिथाईल (०.०६ + ०.००४ कि.ग्रॅ. क्रियाशील घटक प्रति हेक्टरी) फवारावे. ओलित व्यवस्थापन पिकाला फुलोऱ्याच्या अवस्थेत ४० ते ४५ दिवसांनी आणि बोंडे धरण्याच्या अवस्थेत ६५ ते ७० दिवसांनी पाणी द्यावे. किड व रोग व्यवस्थापन गादमाशीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीवर पोहोचल्यास कळी अवस्थेपासून १५ दिवसांच्या अंतराने अझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम (५० मिली) किंवा असिटामीप्रीन २० एसपी (२ ग्रॅम) किंवा इमिडॅक्लोप्रिड १७.८ एसएल (२.५ मिली) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दोन फवारण्या कराव्यात. अल्टरनेरिया ब्लाइट व मर रोग व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया (थायरम/ट्रायकोडर्मा) करावी. तसेच ०.२५ टक्के मॅनकोझेबची फवारणी करावी. उत्पादकता वाढवण्यासाठी कळी लागण्याच्या किंवा फुलोरा अवस्थेत ७५ पीपीएम सॅलिसिलिक ॲसिड (०.७५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फवारावे. पिकाची पाने व बोंड्या पिवळ्या पडल्यावर विळ्याच्या साहाय्याने कापणी करावी. कापणीनंतर ४–५ दिवस वाळवून मळणी करावी व धान्य सुरक्षित साठवून ठेवावे. जवस पिकाच्या सुधारित वाणांची निवड करून वेळेवर पेरणी व योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित