बोधगव्हाण येथील स्मशानभूमीच्या रस्त्याचा वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी!

महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालतीतून शेतरस्ते व महसूलविषयक प्रकरणांचाही निपटारा यवतमाळ, दि. 16 (जिमाका) मौजा बोधगव्हाण येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासंदर्भातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजेशी आणि सार्वजनिक सुविधेशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर तोडगा निघाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. महसूल प्रशासनाच्या पुढाकारातून प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण कार्यवाही ठरली आहे. बोधगव्हाण येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासंदर्भातील प्रश्न ग्रामपंचायत अधिकारी, गट ग्रामपंचायत धानोरा बोथ व गावकरी यांच्या वतीने महसूल प्रशासनाकडे मांडण्यात आला होता. हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालतीच्या अनुषंगाने या प्रकरणावर कार्यवाही करण्यात आली असून, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. यासोबतच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १४३ अन्वये शेतरस्त्यांसंदर्भातील प्रकरणांवरही कार्यवाही करण्यात आली. मौजा लोणी घाटाणा येथील गणेश उ. आगरे व इतर १८ अर्जदारांचे प्रकरण तसेच मौजा वडगाव पोलीस स्टेशन येथील सुधा प्रतिष मर्चट यांचे शेतरस्त्यासंदर्भातील प्रकरण यांचा समावेश होता. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणे आणि शेतीची कामे सुलभ होणे या दृष्टीने अशा प्रकरणांचे निराकरण महत्त्वाचे आहे. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १५५ अन्वये मौजा उमरसरा येथील शेत सर्वे क्रमांक १०/२ संदर्भात अल्का सेवकराम उके यांच्या नावातील दुरुस्तीचे प्रकरण तसेच मौजा मोहा, ता. यवतमाळ येथील महेश संजयराव बहाड यांच्या वारस नोंदीसंदर्भातील प्रकरण निकाली काढण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रलंक्षित महसूलविषयक प्रश्नांवर कायदेशीर प्रक्रियेनुसार कार्यवाही करून महसूल सेवा अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात येत आहे. तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. नागरिकांनी महसूलविषयक प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी आवश्यक कागदपत्रांसह महसूल विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसील कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित