दुर्गोत्सवातील भीतीदायक देखाव्यांमुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणामाची शक्यता

> प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे मंडळांना आवाहन > उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांचे पत्रक जारी यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : दुर्गादेवी उत्सवादरम्यान काही मंडळांकडून भीतीदायक स्वरूपाचे देखावे सादर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर देखाव्यांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवरही प्रसारित होत असून, अशा देखाव्यांचा लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची तसेच त्यांच्यामध्ये भीती, मानसिक ताण अथवा अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुर्गादेवी उत्सव मंडळांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन यवतमाळचे उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी केले आहे. त्याअनुषंगाने, आपल्या मंडळामार्फत सादर करण्यात येणारा देखावा लहान मुलांच्या वयोगटास अनुरूप आहे किंवा नाही, याबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी, भीतीदायक अथवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थता निर्माण करू शकणारा देखावा असल्यास, तो लहान मुलांनी पाहू नये, यासाठी प्रवेशस्थळी स्पष्ट सूचना फलक लावावेत. तसेच, सदर देखावा लहान मुलांना दाखविणे टाळावे, याबाबत प्रत्येक पालकास व त्यांच्या समवेत येणाऱ्या मुलाना योग्य ती पूर्वसूचना द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. उत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक स्वरूप जपत लहान मुलांच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित