जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यांच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय संघ, यवतमाळचे अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य मनोज रणखाम उपस्थित होते.
या ग्रंथप्रदर्शनात प्रामुख्याने संदर्भग्रंथ, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ग्रंथ, मराठी साहित्य तसेच विविध विषयांवरील दर्जेदार ग्रंथ ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचकांना विविध विषयांवरील पुस्तके पाहण्याची व त्यांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेश चव्हाण म्हणाले की, सध्याचे युग डिजिटल असले तरी वाचनामुळे मन आणि मेंदूला मिळणारी चालना, आकलनशक्तीत होणारी वाढ आणि विचारांमध्ये येणारी स्पष्टता ही वाचनातूनच साध्य होते. त्यामुळे वाचनाचे महत्त्व आजही अबाधित आहे. प्रत्येक सार्वजनिक ग्रंथालयाने आपल्या गावातील शाळेला ५० पुस्तके द्यावीत आणि विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करावे. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकातून काय बोध घेतला, याबाबत दहा ओळी लिहून आणण्यास सांगावे. उत्कृष्ट लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटस्वरूपात पुस्तक द्यावे. अशा योजना प्रत्येक वाचनालयाने गावागावांत राबविल्यास वाचनसंस्कृती वाढण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल, तसेच कार्यक्रमांमध्ये बुके ऐवजी पुस्तक भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोज रणखाम यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. ग्रंथालयांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी गावातील चावडीवर ग्रंथालयाचे फलक लावावेत आणि अधिकाधिक वाचकांनी ग्रंथालयात येऊन वाचनाचा लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांनी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन ते भविष्यात भारताचे सक्षम नागरिक बनावेत, या उद्देशाने जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे शालेय विद्यार्थ्यांना वर्गणीदार अथवा सभासद करून घेण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी केले. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या पत्रानुसार यवतमाळ जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये कार्यरत असलेल्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी परिसरातील शाळांना भेटी देऊन संपर्क साधावा. इयत्ता पाचवी व त्यापुढील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना ग्रंथालयाचे सभासद करून घ्यावे. विद्यार्थ्यांचे वय आणि आवड लक्षात घेऊन त्यांना संस्कारक्षम, दर्जेदार बाल व कुमार साहित्य तसेच शालेय उपयोगाचे वाचनसाहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन कविता महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवल कव्हळे यांनी केले. आभारप्रदर्शन आरती कुमरे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित