आंबिया बहार अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 19 (जिमाका) : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत यवतमाळ जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार २०२६-२७ राबविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावावा, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. ही योजना अधिसूचित फळपिके व क्षेत्रांसाठी लागू असून, योजनेत सहभागी होणे ऐच्छिक असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. योजनेतील प्रमुख अटी व नियम अधिसूचित फळपिके : आंबिया बहार २०२६-२७ अंतर्गत संत्रा, मोसंबी व केळी या अधिसूचित फळपिकांसाठी पात्र क्षेत्रातील शेतकरी सहभागी होऊ शकतात. क्षेत्र मर्यादा : प्रति शेतकरी किमान २० गुंठे (०.२० हेक्टर) सलग क्षेत्र असणे आवश्यक आहे. तसेच, सर्व फळपिके मिळून जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा प्रति शेतकरी ४ हेक्टरपर्यंत राहील. उत्पादनक्षम वय : विमा उतरविण्यात येणारी फळबाग शासनाने निश्चित केलेल्या उत्पादनक्षम वयाची असणे आवश्यक आहे. संत्रा व मोसंबी पिकांसाठी ४ वर्षे, तर केळी पिकासाठी १ वर्ष वयाची अट लागू राहील. डिजिटल नोंदणी : योजनेत सहभागी होण्यासाठी डिजिटल पीक सर्वेक्षणांतर्गत संबंधित पिकाची नोंद तसेच ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक असणे अनिवार्य आहे. जिओ टॅगिंग : फळबाग लागवडीचे भू-स्थान निश्चिती छायाचित्र विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. बँक खाते : नुकसान भरपाईची रक्कम थेट खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. विमा अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा उतारा व आठ-अ खाते उतारा, डिजिटल पीक पेरा नोंदणीचा पुरावा, आधार कार्ड व आधार संलग्न बँक पासबुकची प्रत, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नोंदणीकृत भाडेकरारपत्र. अर्ज करण्याची अंतिम मुदत केळी व मोसंबी पिकांसाठी ३१ ऑक्टोबर २०२६, तर संत्रा पिकासाठी ३० नोव्हेंबर २०२६ ही अंतिम मुदत आहे. अधिक माहिती तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना संपर्क जिल्ह्यातील सर्व संत्रा, मोसंबी व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक विमा संकेतस्थळावर किंवा अधिकृत बँकिंग माध्यमातून विमा अर्ज सादर करावा. अर्ज करताना पिकाची नोंद, क्षेत्र, आधार संलग्न बँक खाते व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. योजनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. फळबागांचे आर्थिक संरक्षण करावे जिल्ह्यातील सर्व पात्र फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी आंबिया बहार २०२६-२७ फळपीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या फळबागांचे आर्थिक संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित