जिल्ह्यात आता मोबाईल अॅपद्वारे खत वितरण
> कृषी विभागाचा पथदर्शी प्रकल्प
> २२ ऑक्टोबरपासून ऑनलाइन खत विक्रीला सुरुवात
यवतमाळ, दि. 19 (जिमाका) जिल्ह्यामध्ये २२ ऑक्टोबरपासून मोबाईल अॅपद्वारे खतांची नोंदणी व खरेदी करता येणार आहे. खत वितरण प्रणालीच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलाझर सेल’ या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी यवतमाळ जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. आगामी २२ ऑक्टोबरपासून हा प्रकल्प जिल्ह्यात सुरू होणार असून या प्रणालीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
या प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी जिल्ह्यात ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलाझर सेल’ या पथदर्शी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि सहाय्यक निबंधक यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषिमित्र, कृषिसखी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि सहाय्यक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करावे. या प्रशिक्षणामध्ये प्रणालीची संपूर्ण कार्यपद्धती आणि उद्दिष्टे समजावून सांगावी. प्रत्येक गावासाठी एका अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची नियुक्ती करून गावपातळीवर शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि लोकप्रतिनिधींना या प्रकल्पाची माहिती द्यावी. तसेच या प्रणालीबाबत व्यापक जनजागृती करावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलाझर सेल’ प्रणालीची वैशिष्ट्ये
या प्रकल्पामध्ये शेतकरी ओळख क्रमांक प्रणाली (फार्मर आयडी) आणि खत वितरणाच्या आयएफएमएस प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. खत वितरणासाठी शेतकऱ्यांसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलाझर सेल’ हा ॲप तयार करण्यात आला असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना अनुदानित खतांची बुकींग करून खरेदी करता येणार आहे. हा ॲप गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
या ॲपच्या वापरामुळे खत दुकानांमध्ये खत उपलब्ध आहे की नाही, याची माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी दुकानांमध्ये रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचणार आहे.
शेतकऱ्याने आपल्या पसंतीच्या कृषी सेवा केंद्रावर खताची नोंदणी केल्यानंतर ॲपमध्ये एक क्यूआर कोड निमार्ण होईल. बुक केलेले खत तीन दिवस संबंधित कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्याच्या नावाने राखीव ठेवले जाईल. या कालावधीत शेतकरी आपल्या सोयीनुसार केंद्रावर जाऊन क्यूआर कोड स्कॅन करून खताची उचल करु शकतो.
शेतकऱ्याने खरेदी केलेल्या प्रत्येक अनुदानित खताच्या गोणीची नोंद या प्रणालीमध्ये ठेवली जाणार आहे. त्यामुळे अनुदानित खतांचे समन्यायी वाटप करणे शक्य होईल आणि खतांच्या गैरवापराला आळा घातला जाईल.
खत खरेदीसाठी ॲपची कार्यपद्धती
प्रवेश नोंदणी करा : आपल्या मोबाईलमध्ये ॲप उघडा. त्यामध्ये राज्य निवडा. त्यानंतर शेतकरी ओळख क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करून मोबाईलवर प्राप्त झालेल्या एकवेळच्या ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा.
जमिनीची नोंदणी करा : जमीन स्वतःच्या मालकीची, भाडेपट्ट्याने घेतलेली किंवा संयुक्त मालकीची असल्यास योग्य पर्याय निवडा. जिल्हा, तालुका, गाव आणि गट क्रमांक नमूद करा. त्यानंतर फेच लँड वर क्लिक करून जमिनीची माहिती मिळवा.
पीक निवडा : संबंधित हंगाम निवडून शेतात लागवड केलेले पीक निवडा. निवडलेल्या पिकानुसार खतांची शिफारस उपलब्ध होईल.
खतासाठी अर्ज करा : शासनाच्या सर्वसाधारण खत शिफारशीनुसार खतांची यादी आणि त्यांचे प्रमाण दिसेल. आवश्यकतेनुसार खतांची निवड करा.
खताचे प्रमाण निश्चित करा : आवश्यक खताच्या बॅगांची संख्या निवडा. एका अर्जामध्ये एकापेक्षा अधिक प्रकारच्या खतांची निवड करता येईल.
विक्रेता निवडा : जवळच्या खत विक्रेत्यांची यादी दिसेल. खताचा उपलब्ध साठा आणि अंतर लक्षात घेऊन योग्य विक्रेत्याची निवड करा.
खत घेणारी व्यक्ती निवडा : खत स्वतः घेणार असल्यास ‘स्वतः’ हा पर्याय निवडा. अन्य व्यक्तीमार्फत खत घेणार असल्यास त्या प्रतिनिधीची आवश्यक माहिती भरा. यासाठी आधार क्रमांक आणि भ्रमणध्वनी क्रमांकाची पडताळणी करावी लागेल.
क्यूआर आणि टोकन क्रमांक मिळवा : अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यानंतर क्यूआर आणि टोकन क्रमांक तयार होईल. हे कोड सुरक्षित जतन करून ठेवा.
खत प्राप्त करा : निवडलेल्या विक्रेत्याकडे जाऊन क्यूआर कोड दाखवा. विक्रेता ते तपासून अर्जातील माहिती आणि खताचे प्रमाण पडताळेल. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर खरेदीची पावती घेऊन खत प्राप्त करा.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्याचे आवाहन केले आहे.
‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलाझर सेल’ या ॲपमध्ये आधार क्रमांक वापरूनही लॉग इन करता येत असले, तरी या प्रणालीचा सुरळीत वापर करण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) असणे अधिक सोयीचे आणि प्राधान्याचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार केलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर तयार करून घ्यावा. अन्यथा भविष्यात खतांची बुकींग करताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या प्रक्रियेसाठी जमिनीची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. खतांची खरेदी केवळ नोंदणीकृत विक्रेत्याकडूनच करावी.
अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधा
खतासाठी अर्ज करताना किंवा खत वितरणासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीतील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Comments
Post a Comment