सरकारी दवाखान्यात नौकरी लावून देतो म्हणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नका

> अधिष्ठाता यांचे नागरिकांना आवाहन > शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी भरती > आर्थिक व्यवहार टाळा यवतमाळ, दि. 19 (जिमाका) : श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील वर्ग-३ मधील तांत्रिक व अतांत्रिक तसेच वर्ग-४ संवर्गातील नियमित पदे भरेपर्यंत सदर पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात बाह्यस्रोतांमार्फत भरण्यासाठी शासनाने मे स्मार्ट प्रा. लि., पुणे या कंपनीशी करार केला आहे. सदर पदभरतीची प्रक्रिया संबंधित कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. या कंत्राटी पदभरतीमध्ये नियुक्ती करून देण्याच्या आमिषाने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहाराची मागणी केली जात असल्याबाबतच्या अफवा पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सदर कंत्राटी पदभरतीची प्रक्रिया मे स्मार्ट प्रा. लि., पुणे या खाजगी कंपनीमार्फत राबविण्यात येत असून, या पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही व्यक्तीने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पैशांची मागणी केल्यास अशा आमिषांना बळी पडू नये. तसेच कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या पदभरतीसाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा मध्यस्थाला पैसे देऊ नयेत. अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारातून उद्भवणाऱ्या बाबींसाठी संस्थेची जबाबदारी राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित