ग्रंथभेट योजनेतील निवड झालेल्या ग्रंथांची यादी जाहीर ग्रंथाविषयी सूचना, हरकती व आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 19 (जिमाका) : ग्रंथालय संचालनालयाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून ५१ व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत निवड झालेल्या ग्रंथांची यादी जाहीर झाली असून अवलोकनासाठी खुली करण्यात आली आहे. सन २०२४ मध्ये प्रकाशित होऊन ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी एकूण १,९८३ ग्रंथांची निवड केली आहे.
निवड झालेल्या ग्रंथांमध्ये मराठी भाषेतील ६८५, हिंदी भाषेतील २४६ आणि इंग्रजी भाषेतील २५२ ग्रंथांचा समावेश करण्यात आले आहे. या ग्रंथांची यादी ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबरपर्यंत अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीतील ग्रंथांचे वितरण संचालनालयाच्या नियमानुसार २५ टक्के ग्रंथ सूट दराने करणे बंधनकारक आहे.
या ग्रंथयादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई – ४०० ००१ या पत्त्यावर लेखी स्वरूपात कार्यालयीन वेळेत हस्तबटवड्याने किंवा पोस्टाने किंवा director.dol@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचना, हरकती किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.
निवड यादीतील ग्रंथांची नावे, लेखक, प्रकाशक किंवा किंमत यांमध्ये काही चूक अथवा बदल असल्याचे निदर्शनास आणूण दिल्यास स्वागतार्ह असेल, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment