रब्बी ज्वारीच्या अधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन
यवतमाळ, दि. 23 (जिमाका) : रब्बी हंगामात ज्वारीचे अधिक उत्पादन आणि दर्जेदार धान्य मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी सुधारित वाणांची निवड, वेळेवर पेरणी, खत व पाणी व्यवस्थापन आणि योग्य आंतरमशागतीवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यांनी केले आहे. कमी पाण्यात आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रब्बी ज्वारीच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने केले आहे.
योग्य जमीन व पूर्वमशागत महत्त्वाची
रब्बी ज्वारीच्या लागवडीसाठी मध्यम ते खोल, भारी, अधिक जलधारण क्षमता असलेली आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. खरीप हंगामातील उडीद किंवा मूग काढल्यानंतर वखराच्या तीन ते चार खोल पाळ्या देऊन जमिनीची पूर्वमशागत करावी. पेरणीपूर्वी हेक्टरी १० ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.
वेळेवर पेरणी, प्रमाणित बियाण्यांचा वापर
रब्बी ज्वारीची पेरणी २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण करावी. पेरणीला उशीर झाल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हेक्टरी ७.५ ते १० किलो प्रमाणित बियाणे वापरावे. दोन चाड्यांच्या तिफणीने ४५ सेंटीमीटर अंतरावर पेरणी केल्यास बियाणे आणि खतांची योग्य पद्धतीने पेरणी करता येते.
पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी विरळणी करून दोन रोपांतील अंतर १५ ते २० सेंटीमीटर ठेवावे. हेक्टरी सुमारे १.५० लाख झाडांची संख्या राखावी. विरळणी करताना खोडमाशीचा प्रादुर्भाव झालेली रोपे काढून टाकावीत.
संतुलित खत व्यवस्थापनातून उत्पादनवाढ
कोरडवाहू ज्वारीसाठी हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश देण्याची शिफारस आहे. यासाठी अनुक्रमे ११० किलो युरिया, १५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश वापरता येते.
ओलिताखालील ज्वारीसाठी हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. यापैकी ४० किलो नत्रासह संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरित ४० किलो नत्र पीक २५ ते ३० दिवसांचे झाल्यावर द्यावे. खतांचा वापर करताना जमिनीचा प्रकार, माती परीक्षण आणि कृषी विभागाच्या शिफारशींना प्राधान्य द्यावे.
सुधारित वाणांची निवड करा
रब्बी ज्वारीच्या अधिक उत्पादनासाठी सुधारित व संकरित वाणांची निवड महत्त्वाची आहे. सी.एस.एच.-१९ आर, पीकेव्ही क्रांती, फुले यशोदा आणि सी.एस.व्ही.-१८ आर यांसारख्या वाणांचा विचार करता येतो. संबंधित वाणाची परिपक्वता, धान्य व कडबा उत्पादन, स्थानिक हवामान आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन वाण निवडावा.
हुरड्यासाठी ट्रॉम्बे अकोला सुरूची (टी.ए.के.पी.एस.-१) हा विशेष वाण उपयुक्त आहे. हा वाण साधारण ९० ते ९५ दिवसांत तयार होतो. वाणाची निवड करताना स्थानिक कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागाकडून शिफारशीनुसार माहिती घ्यावी.
पाणी व्यवस्थापन आणि आंतरमशागतीकडे लक्ष द्या
ओलिताची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये पाणी द्यावे. पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी जोमदार वाढीच्या सुरुवातीला, ६० ते ६५ दिवसांनी पोटरीच्या अवस्थेत, ७० ते ७५ दिवसांनी फुलोऱ्याच्या काळात आणि ८५ ते ९५ दिवसांनी दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याची गरज लक्षात घेऊन ओलित करावे.
पीक ४० ते ४५ दिवसांचे होईपर्यंत दोन ते तीन वेळा कोळपणी आणि एक ते दोन वेळा खुरपणी करावी. यामुळे तणांचे नियंत्रण होऊन पिकाला उपलब्ध अन्नद्रव्ये आणि ओलावा यांचा अधिक चांगला उपयोग होतो.
कापणी व साठवणुकीतही घ्या काळजी
ज्वारीचे पीक पूर्ण परिपक्व झाल्यानंतर वेळेवर कापणी व मळणी करावी. साठवणुकीपूर्वी धान्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपर्यंत आणावे. योग्य वाण, वेळेवर पेरणी, संतुलित खतांचा वापर आणि पाणी व्यवस्थापन या बाबींचे नियोजन केल्यास रब्बी ज्वारीचे उत्पादन व गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
रब्बी हंगामात कमी पाण्यात आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी सुधारित वाणांचा वापर करून शिफारशीत लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी केले आहे.
Comments
Post a Comment