जिल्ह्याबाहेरील पशुधनाच्या चराईवर बंदी!
> जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी
यवतमाळ, दि. 26 (जिमाका) जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि स्थानिक पशुधनासाठी उपलब्ध असलेल्या चाऱ्याचा मर्यादित साठा लक्षात घेता, जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रात बाहेरील जिल्ह्यांतील तसेच इतर राज्यांतील पशुधन चराईसाठी आणण्यास प्रशासनाने संपूर्ण बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विकास मीना यांनी आदेश जारी केले असून, हे आदेश २३ ऑक्टोबर पासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार आहेत.
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे निर्णय
सन २०२६ च्या खरीप हंगामात ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.
सध्या दुष्काळसदृश परिस्थिती झाली असून जिल्ह्यात एकूण ८ लाख १८ हजार १३८ पशुधन आहे. खरीप पेरा आणि पशुसंवर्धन विभागाकडून होणारे वैरण वाटपापासून मिळणारा चारा पाहता, जिल्ह्यातील स्थानिक पशुधनासाठी १५ एप्रिल २०२७ पर्यंतच पुरण्याची शक्यता आहे. जिल्ह्याबाहेरील पशुधनाच्या चराईवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
मेंढ्या, शेळ्या, गायी-म्हशींना प्रवेशबंदी
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम २५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याबाहेरील कोणत्याही जिल्ह्यातील किंवा इतर राज्यातील मेंढ्या, शेळ्या, गायी, म्हशी आणि अन्य पशुधन यांना जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रातील गायरान जमिनीवर चराईसाठी आणण्यास तातडीने आणि संपूर्ण प्रतिबंध घालण्यात आला आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्याबाहेरील पशुधन जिल्ह्यात चराईसाठी आणल्यास संबंधित पशुपालकाविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्याबाहेरील पशुधनाच्या चराईसंदर्भातील आदेशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment