उन्हाळ्याची चाहुल ; आरोग्याची अशी घ्या काळजी Ø डॉ. उमेश जोगे यांचे आवाहन
यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : उन्हाळ्याला सुरुवात झाल्यामुळे कडक उन्हात विविध आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. वाढत्या उष्णतेमुळे घाम येणे, डोकेदुखी, अतिसार, पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात डीहायड्रेशन होणे तसेच बद्धकोष्ठता यांसारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्याच्या दिवसात स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. उमेश एस. जोगे यांनी केले आहे.
उन्हाळ्यात चक्कर येणे, डोळ्यांची जळजळ, ऊन लागणे, डीहायड्रेशन तसेच उष्माघात यांसारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे केवळ पंखे किंवा एसीवर अवलंबून न राहता आहार आणि दिनचर्या योग्य ठेवणे गरजेचे आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड आणि चायनीज पदार्थांचे सेवन टाळावे. त्याऐवजी आहारात हिरव्या भाज्या, कोथिंबीर, फळे यांचा समावेश करावा. तसेच घरगुती गोड शरबत, लिंबूपाणी, काकडीचा रस, ताक व मठ्ठा यांसारख्या पेयांचा वापर करावा.
दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो उन्हात जाणे टाळावे. बाहेर जाताना टोपी, सनग्लासेस वापरावेत तसेच सुती कपड्यांचा वापर करणे आरोग्यासाठी हितावह ठरते. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ५ नंतर करावीत, जेणेकरून कडक उन्हापासून बचाव होईल. तसेच उन्हाळ्यात सामाजिक समारंभ व लग्नकार्यांमध्ये मोठ्या संख्येने लहान मुले, महिला व वृद्ध सहभागी होत असल्याने आयोजकांनी शुद्ध पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था ठेवावी. त्यामुळे जलजन्य आजार टाळण्यास मदत होईल.
उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आरोग्यविषयक कोणतीही समस्या उद्भवल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके यांच्या मार्गदर्शनाखाली जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. उमेश एस. जोगे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
Comments
Post a Comment