अवेळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे व मालमत्तेचे पंचनामे करा
जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश
यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यात मार्च महिन्यात बहुतांश तालुक्यात अवेळी पाऊस] गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे व मालमत्तेचे (घरांचे) टिनपत्रे उडुन नुकसान झाल्याच्या घटनांची नोंद झालेली आहे. या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, नुकसान झालेल्या क्षेत्राचे अ, ब, क, ड या निकषांनुसार निधी मागणी प्रस्ताव तयार करून तात्काळ सादर करावे. घरांसारख्या मालमत्तेच्या नुकसानीसाठीही स्वतंत्र पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसिलदारांना दिले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार दारव्हा तालुक्यांत अवेळी पावसामुळे शेतीपिके नजर अंदाजे 42 हेक्टर वरील गहु, तिळ, ज्वारी या शेती पिकांचे नुकसान झाले असल्याची व बाभुळगांव तालुक्यात 2 हेक्टर वरील ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. तसेच वणी तालुक्यांत वादळी वाऱ्यामुळे एका घराची अंशत; पडझड , पुसद तालुक्यात एका मोठ्या पशुधनाचा मृत्यू आणि वणी तालुक्यात एका घराची पडझड झाल्याची नोंद झाली आहे. या सर्व नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
Comments
Post a Comment