यवतमाळ महोत्सवात जिल्हास्तरीय पशुप्रदर्शन उत्साहात; पशुपालकांचा उस्फूर्त प्रतिसाद
यवतमाळ,दि.30 (जिमाका) : यवतमाळ महोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषद यवतमाळ व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित सन २०२५-२६ साठीच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनाचा समारोप उत्साहात पार पडला. २७ व २८ मार्च रोजी आयोजित या प्रदर्शनात जिल्ह्यातील १६ तालुक्यातील पशुपालकांनी आपल्या उत्कृष्ट जनावरांसह लक्षणीय सहभाग नोंदवला.
दिग्गजांच्या हस्ते झाले उद्घाटन*
या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हस्ते व जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, आणि जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ. मंगेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
२७५ पशुपक्ष्यांचा सहभाग आणि आठ गट
प्रदर्शनात जिल्ह्यातील १६ तालुक्यातून एकूण २७५ पशुपक्ष्यांची नोंदणी झाली होती. हे प्रदर्शन एकूण आठ गटांमध्ये विभागले गेले होते. त्यामध्ये संकरित वासरे (नर गट), संकरित वासरे (मादी गट), संकरित गाय वर्ग, देशी व गावठी गाय वर्ग, म्हैस वर्ग, बैल जोडी, शेळी वर्ग, कुक्कुट (पक्षी) वर्ग करण्यात आले होते.
प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ तसेच प्रदर्शनामध्ये सहभागी सर्व पशुपक्ष्यांना प्रोत्साहन पर बक्षीसे असे एकूण बारा लाख रुपयांचे रोख बक्षीसे, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा: पशुपालन
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विकास मीना होते. यावेळी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. येसूदेव वंजारी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
> "शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केवळ शेतीवर अवलंबून न राहता पशुपालन करणे काळाची गरज आहे. दुग्धोत्पादन, शेळीपालन आणि कुक्कुटपालनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते. पशुसंवर्धन विभाग यासाठी सदैव तत्पर असून, भविष्यात यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर प्रदर्शने आयोजित करण्याचा आमचा मानस आहे," असे प्रतिपादन मान्यवरांनी आपल्या भाषणात केले.
या प्रदर्शनाला संपूर्ण जिल्ह्यातून पशुपालक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी सदर पशुप्रदर्शन यशस्वी होण्यासाठी अहोरात्र काम केले. पशुपालकांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






Comments
Post a Comment