आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन योजना
२२ मार्चला चाळणी परीक्षा
यवतमाळ, दि.१८ (जिमाका) : शासनामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन योजना राबविण्यात येत असून त्यासाठी २२ मार्च रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आदिवासी विकास विभागातंर्गत शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, ईएमआरएस अंतर्गत इ.११ वी व इ.१२ वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करुन घेण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १० वी नंतर २ वर्ष कालावधीकरीता नामांकित खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहाय्याने शासकीय आश्रमशाळेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी योजना राबविण्यास शासनाव्दारे मंजुरी प्राप्त झाली आहे.
या मार्गदर्शन वर्गाकरीता निवड करण्याकरिता चाळणी परीक्षा २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिचघाट ता.जि.यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यालयात तसेच प्रत्यक्ष किंवा मुख्याध्यापक प्राचार्य यांनी अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना दि. २२ मार्च रोजी चाळणी परीक्षेस परीक्षा स्थळी सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांनी केले आहे.
Comments
Post a Comment