गॅसचा अवैध साठा, काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होणार
जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश
प्रशासकीय यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावे
गॅस पुरवठा सुरळीत होत असल्याची खात्री करावी
गॅसची ऑनलाईन नोंदणी तात्काळ सुरु करावी
जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावे, तसेच गॅसचा अवैध साठा किंवा काळाबाजार आढळून आल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व गॅस पुरवठ्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आज महसूल भवनात आढावा बैठक घेतली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मुन, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तालुकानिहाय गॅस पुरवठ्यासंदर्भात यंत्रणा व गॅस एजन्सीकडून आढावा घेतला. यात त्यांनी नागरिकांमध्ये घबराटीचे व अफवांचे वातावरण आहे ते दूर करण्यासाठी जनजागृती करावी. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि पुरवठा विभागांनी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन नियोजन करावे. नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत सुरु असल्याची खात्री करावी. गॅस सिलेंडरची ऑफलाईन नोंदणी सुरु असली तरी ऑनलाईन गॅस नोंदणीतील तांत्रिक अडचणी दूर करुन ती नोंदणी तात्काळ सुरु करावी. वसतीगृह, शिक्षण व आरोग्य व्यवस्थापनांना गॅसची उपलब्धता करावी. कोणत्याही ठिकाणी कायदा व सुन्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी दिल्या.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
दरम्यान, गॅस पुरवठ्यासंदर्भात जिल्हा व स्थानिक प्रशासनाने नियोजन केले असून त्यानुसार घरगुती गॅसचे वितरण सुरळीतपणे केले जात आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता अनावश्यक गर्दी करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले.
Comments
Post a Comment