जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

 यंदाही जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची बाजी ; एकूण 80 विद्यार्थ्यांची निवड यवतमाळ, दि.24 (जिमाका) : घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वीच्या प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत जिल्ह्यातील एकूण 80 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यापैकी यंदाही जिल्हा परिषद शाळेच्या 47 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई तर्फे 13 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती. या प्रवेश परीक्षेचा निकाल 17 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली असून 2025-26 आणि 2026-27 या शैक्षणिक वर्षांच्या तुलनात्मक निकालानुसार, जिल्हा परिषद शाळांमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 38 वरून 47 वर पोहोचली आहे. तर खाजगी शाळांमधील निवड 38 वरून 24 पर्यंत घटली असून, इतर शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 4 वरून 9 इतकी वाढली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा निकाल तब्बल 93.75 टक्के लागला असून, शहरी भागातील विद्यार्थ्यांचा निकाल केवळ 6.25 टक्के आहे. यावरून ग्रामीण विद्यार्थ्यांची प्रगती दिसून येते. नवोदय विद्यालय समितीच्या निर्देशानुसार, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रियेबाबत लवकरच कळविण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य के.डी.धोपटे यांनी दिली आहे. चौकट “जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 47 विद्यार्थ्यांची निवड ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी 93.75 टक्के यश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा पाठिंबा यामुळे हा यशस्वी परिणाम साध्य झाला आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा.” - जिल्हाधिकारी विकास मीना

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती