आदिवासी शेतकऱ्यांनो ‘ड्रोन’ घ्या, शासन देणार 100 टक्के अनुदान!

आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्या पात्र, 30 दिवसांचे प्रशिक्षण, 20 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांच्यामार्फत ड्रोन संच खरेदीसाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (एफपीओ) 20 मार्चपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत १०० टक्के आदिवासी शेतकरी सदस्य असलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ड्रोन संच खरेदीसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. संबंधित एफपीओमध्ये सर्व सदस्य आदिवासी शेतकरी असणे तसेच कंपनीची नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. तसेच कंपनीचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असणे आवश्यक असून, यापेक्षा अधिक वर्षांचे लेखापरीक्षण झाले असल्यास अशा कंपन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. ही योजना जिल्ह्यातील यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, झरी, पांढरकवडा आणि घाटंजी या तालुक्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी लागू राहणार आहे. ड्रोनचा वापर शेतीसाठी तसेच विविध कृषी कामांसाठी करण्यात येणार असून शासनाच्या नियमांनुसार त्याचा वापर करणे बंधनकारक राहील. ड्रोन खरेदीची प्रक्रिया पूर्णपणे कॅशलेस अर्थात डीडी, चेक, आरटीजीएस पद्धतीने करणे आवश्यक राहील. या योजनेचे समन्वय अधिकारी म्हणून आत्माचे प्रकल्प संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ड्रोन चालविण्यासाठी डीजीसीए मान्यताप्राप्त संस्थेमार्फत रिमोट पायलट प्रशिक्षण घेणे आवश्यक असून निवड झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत हे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक राहील. योजनेअंतर्गत अर्ज करताना कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, कंपनीचा ठराव (रिझोल्यूशन), संचालक मंडळाची यादी, आधार किंवा पॅन तपशील, बँक खाते तपशील तसेच ड्रोन खरेदीसाठी अंदाजपत्रक किंवा कोटेशन (कृषी यांत्रिकीकरण उपअभियान एसएमएएम मार्गदर्शक सूचनांनुसार) सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्जाची मुळ कॉपी 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, गार्डन रोड, जुना बसस्टॉप जवळ, जिल्हा यवतमाळ येथे सादर करावी. अधिक माहितीसाठी आत्मा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रकल्प संचालक मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती