शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनासाठी विशेष ‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम
एप्रिलमध्ये आयोजन
पोकरा प्रकल्प व पाणी फाउंडेशनचा उपक्रम
यवतमाळ, दि.24 (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात ‘विशेष डिजिटल शेतीशाळा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान’ अभियानाचा मुख्य टप्पा असून, बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये सुधारणा करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीकनिहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन मिळावे हा या 'डिजिटल शेतीशाळा'चा मुख्य हेतू आहे. या उपक्रमात कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, माविम, उमेद आणि आत्मा यांसारख्या विविध संस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे.
डिजिटल शेतीशाळा वेळापत्रक आणि विषयानुसार
हे प्रशिक्षण यूट्यूब च्या माध्यमांतून पाणी फाउंडेशनच्या https://youtube.com/@paanifoundation?si = oczLOIG|PLw- Ivic किंवा नानाजी देशमुख कृषी
संजीवनी प्रकल्पच्या https://youtube.com/@pocramaharashtra?si=jAj68X_JYT79zE4
अधिकृत चॅनलवर सायंकाळी ७:३० वाजता थेट प्रक्षेपित केले जाणार आहे.
त्यामध्ये १ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान : बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, आंतरपीक पद्धत व बीजप्रक्रिया,
८ एप्रिल रोजी जैविक निविष्ठा : बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, लिंबोळी अर्क व दशपर्णी अर्क निर्मिती,
१५ एप्रिल रोजी कीड व्यवस्थापन : एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM), सापळा पिके, पक्षी थांबे व चिकट सापळे,
२२ एप्रिल रोजी भात शेती तंत्रज्ञान : भाताची थेट पेरणी (DSR), श्री पद्धत व लावणीसाठी यांत्रिकीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक प्रकल्प गावात एका मध्यवर्ती ठिकाणी किमान ४० ते ५० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन डिजिटल शेतीशाळेत सहभागी व्हावे, तसेच किमान दोन महिला बचत गटांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय गावातील ३० ते ४० शेतकरी कुटुंबांनी आपल्या घरी ऑनलाइन उपस्थित राहूनही या उपक्रमाचा लाभ घ्यावा, तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment