दिव्यांग व्यक्तींसाठी आता ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ सेवा व योजनांची माहिती एकाच ठिकाणी ऑनलाईन अर्ज व पाठपुराव्याचीही सुविधा दिव्यांग नागरिक, संस्थांनी नोंदणी करावी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन
यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : दिव्यांग कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध कल्याणकारी सेवा व योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी “महाराष्ट्र दिव्यांग सहाय्यक पोर्टल” हे स्वतंत्र नागरिक-केंद्रित डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या विविध शासकीय योजना व सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जाची स्थिती रिअल-टाईममध्ये पाहण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे दिव्यांग नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे.
तसेच दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) व नागरी संस्थांना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 50 अन्वये नोंदणी व नूतनीकरण करणे आवश्यक असून ही सुविधा देखील या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सर्व सुविधा https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग नागरिक तसेच दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, एनजीओ व नागरी संस्थांनी या संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.


Comments
Post a Comment