यवतमाळ तालुक्यात विशेष महसूल शिबिरांचे आयोजन; नागरिकांनी लाभ घ्यावा तहसीलदार योगेश देशमुख यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 5 (जिमाका) : यवतमाळ तालुक्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या टप्पा क्रमांक १ अंतर्गत यवतमाळ तालुक्यात मंडळनिहाय विशेष महसूल शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरांमुळे तालुक्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम यांची बचत होऊन प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख होईल. जिल्हाधिकारी विकास मीना तसेच उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. शिबिरांमध्ये शेतकऱ्यांची प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे,सातबारा व ८-अ उताऱ्यातील त्रुटी दुरुस्त करणे तसेच डिजिटल स्वाक्षरीयुक्त उतारे तात्काळ उपलब्ध करून देणे अशा सेवा प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांसाठी उत्पन्न, जात, रहिवासी व नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून विविध दाखल्यांचे तात्काळ वितरण करण्यात येईल. तुकडेबंदी व्यवहाराबाबत मार्गदर्शन, अकृषक परवानगीबाबत माहिती ई-मोजणी अर्ज स्वीकृती, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी तसेच भूसंपादनासंबंधी कमी- जास्त पत्रके तयार करण्याची सुविधा देखील शिबिरात उपलब्ध राहणार आहे. शिबिरांच्या वेळापत्रकानुसार ७ मार्च रोजी हर्जुना मंडळ, १४ मार्च रोजी लोहारा मंडळ, २४ मार्च रोजी येळाबारा मंडळ, १ एप्रिल रोजी कापरा मे. मंडळ, १० एप्रिल रोजी मोहा मंडळ, १७ एप्रिल रोजी अकोला बाजार मंडळ, २९ एप्रिल रोजी कोळंबी मंडळ, ८ मे रोजी हिवरी मंडळ, १५ मे रोजी सावरगड मंडळ, २२ मे रोजी यवतमाळ मंडळ,या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी संबंधित नागरिकांनी शिबिराच्या दिनांकापूर्वी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसिलदार योगेश देशमुख यांनी यावेळी केले

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती