उद्यापासून जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान Ø 16 तालुक्यात शिबिरांचे आयोजन Ø 15 पेक्षा अधिक महसुली सेवा
यवतमाळ, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण व जनतेच्या तक्रारी निकाली काढण्यासह विविध योजनांचे लाभ देण्यासाठी उद्या दि. 7 मार्चपासून जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-1’ राबविण्यात येणार आहे. हे अभियानाचा 22 मे 2026 पर्यंत चालणार असून प्रत्येक महसूल मंडळ व नगरपरिषद स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना शिबिरस्थळी 15 पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या शिबिरांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले फेरफार प्रकरणे निकाली काढणे, 7/12 उताऱ्यातील चुकांची दुरुस्ती करणे तसेच डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 व 8-अ उतारे वितरित करणे या सेवा दिल्या जाणार आहेत. याशिवाय उत्पन्न, रहिवासी आणि जात प्रमाणपत्र तसेच नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
तसेच अकृषक (एनए) परवानगीसंदर्भातील मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती देणे आणि सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे यासारख्या सेवा देखील शिबिरात दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप तसेच ई-मोजणी अर्ज स्वीकारणे या कामांचाही समावेश आहे.
यासोबतच अॅग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी करण्यात येणार असून भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणांमध्ये कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्याचे कामही शिबिरात केले जाणार आहे.
शिबिराच्या दिवशी अंतिम मंजुरी आदेश व दुरुस्त कागदपत्रे मिळण्यासाठी नागरिकांनी शिबिर दिनांकापूर्वीच आवश्यक अर्ज आणि कागदपत्रे संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याकडे जमा करावीत, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
‘प्रशासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून प्रशासन थेट नागरिकांच्या सेवेत येत असल्याचे सांगत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या ‘महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक
जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा-1’ अंतर्गत मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार 7 मार्च 2026 रोजी हर्जुना ता.यवतमाळ, वेणी ता.बाभुळगाव, लोनबेहळ ता. आर्णी, चिखली ता. दारव्हा, शिरजगाव ता. नेर, बोरी खु ता. पुसद, तुपटाकळी ता. दिग्रस, कुपटी ता. उमरखेड, हिवरा ता. महागाव, चालबर्डी ता.केळापूर, शिरोला ता. घाटंजी, शिबला ता. झरीजामणी, गणेशपूर ता. वणी, मार्डी ता. मारेगाव, वरध ता. राळेगाव आणि सावरगाव ता. कळंब येथे शिबिरे होणार आहेत.
14 मार्च 2026 रोजी लोहारा ता.यवतमाळ, सावर ता.बाभुळगाव, जवळा ता. आर्णी, लोही ता. दारव्हा, मोझर ता. नेर, वरुड ता. पुसद, सिंगद ता. दिग्रस, निंगपूर ता. उमरखेड, काळी दौ ता. महागाव, केळापूर ता.केळापूर, साखर खु ता. घाटंजी, खडकडोह ता. झरीजामणी, राजुरा ता. वणी, वनोडी ता. मारेगाव, वाढोणा (बा) ता. राळेगाव आणि पिंपळगाव ता. कळंब येथे शिबिरे होणार आहेत. त्यानंतर 24 मार्च, 1 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 29 एप्रिल, 8 मे, 15 मे आणि 22 मे 2026 या कालावधीत जिल्ह्यातील इतर महसूल मंडळांमध्ये टप्प्याटप्प्याने शिबिरे पार पडणार आहेत.
Comments
Post a Comment