मेरा युवा भारत तर्फे शहीद दिवस पदयात्रा व स्वच्छता अभियान संपन्न

यवतमाळ, दि.24 (जिमाका) : ‘मेरा युवा भारत’ युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिवसानिमित्त पदयात्रा व श्रमदान स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 23 मार्च रोजी सकाळी नेहरू स्टेडियम, गोधणी रोड येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. ही पदयात्रा नेहरू स्टेडियम ते अँग्लो हिंदी हायस्कूल, जाजू चौक मार्गे हुतात्मा चौकापर्यंत नेण्यात आली. हुतात्मा चौकात देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना अभिवादन करण्यात आले. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या प्रसंगी अभ्यंकर कन्या शाळेचे उपप्राचार्य अविनाश जोशी यांनी उपस्थित युवकांना शहीद जवानांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर पदयात्रा पुन्हा जाजू चौक मार्गे नेहरू स्टेडियम येथे परतली. या पदयात्रेत ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, अनिल ढेंगे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सचिन हरणे, क्रीडा अधिकारी हेमंत कटयारमल, प्रा. संजय पंदीरवाल, अविनाश जोशी, यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशनच्या अध्यक्षा मनीषाताई आकरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले. 22 मार्च रोजी हुतात्मा चौकात जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था तसेच जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. नगर परिषद अग्निशामक दलाने पुतळ्याची स्वच्छता केली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘मेरा युवा भारत’ यवतमाळ कार्यालयाचे सारंग मेश्राम, अनिल ढेंगे, रवि शेळके व मनीष आळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित