‘चला खेळू या’ उपक्रमांतर्गत 15 दिवसीय क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या “चला खेळू या” या नाविन्यपूर्ण क्रीडा उपक्रमांतर्गत निवड झालेल्या खेळाडूंसाठी 15 दिवसीय प्रशिक्षण शिबिरास 16 मार्चपासून प्रारंभ करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर 16 ते 30 मार्च 2026 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, नेहरू स्टेडियम, गोधनी रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून निवड झालेल्या 17 वर्षे वयोगटातील मुले व मुली सहभागी झाले आहेत.
या शिबिरामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, वेट लिफ्टिंग, मैदानी खेळ व बुद्धीबळ या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण अनुभवी प्रशिक्षकांकडून देण्यात येणार आहे. विविध क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ञांकडून 15 दिवस नियमित कार्यशाळा होणार आहे. तसेच आर्चरी या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण तालुका क्रीडा संकुल, दिग्रस येथे आयोजित करण्यात येणार आहे.
ग्रामीण व शालेय स्तरावरील खेळाडूंमध्ये असलेल्या सुप्त क्रीडा गुणांना वाव देणे, त्यांच्या कौशल्याचा विकास करणे तसेच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाडू घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या 15 दिवसीय निवासी शिबिराच्या निमित्ताने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना याचा लाभ होणार असून हे शिबिर भविष्यात खेळाडूंना निश्चितच उपयोगी ठरेल, तसेच नियमित सराव, शिस्त व प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात यश संपादन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी विकास मीना व जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment