ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांच्या मूल्यमापनाचा अंतिम निर्णय बाकी Ø कलावंतांनो आमीषाला बळी पडू नका ; पैशाची मागणी होत असल्यास तक्रार करा Ø फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा
यवतमाळ, दि. ९ (जिमाका) : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत तीन वर्षांसाठी प्रलंबित असलेल्या तपासण्या २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत पंचायत समिती स्तरावर घेण्यात आल्या आहेत. या तपासणीदरम्यान कलावंतांकडून त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करून प्रत्येक कलावंताचे ५० गुणांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. ही मूल्याकंन प्रक्रिया अद्याप सुरू असून अंतिम निर्णय होणे बाकी आहे. दरम्यान, काही तालुक्यांमध्ये चाचणी चमूमधील काही सदस्यांकडून कलावंतांना विविध आमीष दाखवून फसवणूक करण्याचे प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकरणी अशा व्यक्तींविरुद्ध कठोर फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असून, यामध्ये कोणत्याही सदस्य किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व कलावंत व साहित्यिकांनी कोणत्याही प्रकारच्या आमीषांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जर कुणीही पैशाची मागणी करत असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा परिषद यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) तथा सदस्य सचिव, राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना जिल्हा समिती, यवतमाळ यांनी केले आहे.
Comments
Post a Comment