तुती लागवड व रेशीम उद्योगासाठी अर्थसहाय्य मिळणार

महा रेशीम अभियानांतर्गत लागवडीचे शेतकऱ्यांना आवाहन यवतमाळ, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात तुती लागवड व रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी रेशीम संचालनालय, नागपूर यांच्या माध्यमातून ‘महा रेशीम 2026’ अभियान राबविण्यात येत आहे. 4 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना रेशीम शेतीबाबत माहिती देऊन नवीन लाभार्थी तयार करण्यावर भर दिला जात आहे. संचालक, रेशीम संचालनालय यांच्या निर्देशानुसार ज्या गावांमध्ये यापूर्वी तुती लागवड व रेशीम उद्योग राबविण्यात आला आहे, त्या गावांमध्ये शिबिरे आयोजित करून नव्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. तसेच लगतच्या गावांमध्येही या योजनेचा विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, अर्ज करताना आधार कार्ड, सातबारा उतारा, 8-अ सही नमुना तसेच तुती लागवडीच्या क्षेत्राचे छायाचित्र अपलोड करणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क म्हणून 559 रुपये (जीएसटीसह) ऑनलाइन जमा करावे लागतात. अर्जांची छाननी जिल्हा रेशीम अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येऊन त्यानंतर मान्यता दिली जाते. सध्या जिल्ह्यात 654 शेतकऱ्यांकडे 749.50 एकर क्षेत्रावर तुती लागवड आहे. सन 2026-27 साठी आतापर्यंत 89 शेतकऱ्यांनी 94 एकर क्षेत्रासाठी नोंदणी केली असली, तरी जिल्ह्यास 300 एकर लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम अधिकारी सुनीलदत्त प्रभाकर फडके यांनी दिली. मनरेगा अंतर्गत तुती लागवड, जोपासना व रेशीम किटक संगोपन गृहासाठी तीन वर्षांत 4 लाख 32 हजार रुपयांची मदत दिली जाते. तसेच ‘सिल्क समग्र-2’ या केंद्र पुरस्कृत योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गासाठी 75 टक्के अनुदान उपलब्ध आहे. यामध्ये 1 एकर तुती लागवडीसाठी 45 हजार रुपये, ठिबक सिंचनासाठी 45 हजार रुपये, किटक संगोपन गृहासाठी 2 लाख 43 हजार 750 रुपये, संगोपन साहित्य व निर्जंतुकीकरणासाठी अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती व जमातींसाठी हे अनुदान 90 टक्क्यांपर्यंत आहे. कृषी विभागाच्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) टप्पा-दोन’ अंतर्गत जिल्ह्यातील 559 गावे निवडण्यात आली असून, या योजनेतूनही तुती लागवड व रेशीम उद्योगासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. इच्छुक शेतकऱ्यांनी ग्राम विकास समितीमार्फत सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती