नेरच्या उत्तरवाढोणा येथे रिलायन्सचा बायोगॅस प्रकल्प

बायोगॅस निर्मितीत जिल्हा होणार आत्मनिर्भर;शेतकऱ्यांनाही फायदा होणार पालकमंत्री ना. संजय राठोड यांचा पुढाकार यवतमाळ, दि.20 (जिमाका) : नेर तालुक्यातील मौजा उत्तरवाढोणा येथे रिलायन्स इंडस्ट्रिज कंपनीच्या माध्यमातून सुमारे 300 कोटी रुपयांचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्हा गॅस निर्मितीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करणार असून शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी पुढाकार घेतला असून आज त्यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला. या प्रकल्पासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आढावा बैठक घेवून प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, गटविकास अधिकारी, सरपंच तसेच रिलायन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शासन व प्रशासनाची भूमिका सकारात्मक असून प्रकल्पासाठी आवश्यक असलेला वीज व पाणी पुरवठा तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. तसेच ग्रामसभा आयोजित करून स्थानिक ग्रामस्थांना प्रकल्पाची सविस्तर माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करावे, तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करण्याचे निर्देश पालकमंत्री राठोड यांनी दिले. ठळक वैशिष्ट्ये :  इंधन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल : या प्रकल्पामुळे जिल्ह्यातच बायोगॅस निर्मिती होणार असून बाहेरील इंधनावरचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.  शेतकऱ्यांना थेट फायदा : शेतीतील कचरा (पेंढा, शेण, ऊसाचा कचरा इ.) वापरून गॅस निर्मिती केली जाणार असल्याने शेतीतील कचऱ्याला चांगला दर मिळेल.  मोठ्या प्रमाणावर रोजगार : प्रकल्पामुळे सुमारे २०० थेट तर सुमारे १५०० अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.  पर्यावरणपूरक प्रकल्प : कचऱ्याचा पुनर्वापर करून इंधन निर्मिती होणार असल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.  प्रशासनाचे सहकार्य : वीज, पाणी व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन-प्रशासन सहकार्य करण्यात येईल. सध्याच्या जागतिक परिस्थितीत इराण व इस्त्राईल यांच्यासह आखाती देशांमधील तणावामुळे इंधन टंचाई व दरवाढीचे संकट निर्माण होत आहे. अशा पार्श्वभूमीवर कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प हा यवतमाळ जिल्‌ह्यात पर्यावरणपूरक, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारा आणि इंधन आत्मनिर्भरतेला चालना देणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती