गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस

हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ जारी यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : राज्यात गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान तंत्र कायदा तसेच वैद्यकीय गर्भपात कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्ह्यात या कायद्याचा भंग होत असल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कायद्यांच्या उल्लंघनाची माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यवतमाळ यांनी दिली आहे. मान्यताप्राप्त केंद्रामध्ये वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन होत असल्यास, गर्भलिंग चाचणी करून अवैधरित्या गर्भपात केले जात असल्यास किंवा अपात्र व्यक्तीकडून गर्भपात केला जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, यवतमाळ यांना कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर त्याची खातरजमा करून संबंधित सोनोग्राफी केंद्र, गर्भपात केंद्र किंवा संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर माहिती देणाऱ्या व्यक्तीस प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. माहिती देणारी व्यक्ती सामान्य नागरिक, आरोग्य विभागातील कर्मचारी-अधिकारी तसेच इतर शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी-अधिकारी असू शकतात. तसेच माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येणार आहे. गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान कायद्याचा भंग होत असल्याचे आढळल्यास हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ वर तक्रार नोंदवावी किंवा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, यवतमाळ येथे कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती