लोकसहभागातून जिल्ह्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहीम नागरिकांनो सहभागी व्हा - आरोग्य विभागाचे आवाहन Ø १ एप्रिलपासून अभियानास सुरुवात Ø गावांचे मूल्यमापन होणार Ø ग्रामपंचायत स्तरावर समित्या
यवतमाळ, दि. 5 (जिमाका) : राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या महत्वाकांक्षी अभियानास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. लोकसहभागावर आधारित ही राज्यव्यापी आरोग्य चळवळ मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आली असून १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातही “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ राहावे तसेच आरोग्य सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
गावपातळीवर नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना चालना देण्यासाठी तसेच आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही मोहीम प्रभावी ठरणार आहे. सार्वजनिक स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, सामाजिक प्रबोधन या सह ग्रामीण भागातील विविध घटकांच्या समन्वयाने आरोग्यदायी गाव निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानांतर्गत उपचारांपेक्षा आजार होऊ नयेत यावर विशेष भर देण्यात येणार आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता-बाल आरोग्य सुधारणा, पोषण, स्वच्छता, सुरक्षित पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, जलजन्य आजारांचे नियंत्रण तसेच मानसिक आरोग्य या विषयांचा या मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे.
“माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. आरोग्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती कार्यरत राहणार असून विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, आयुक्त व संचालक हे सदस्य असतील. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृती समितीही स्थापन करण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार गावांचे मूल्यमापन करण्यात येणार असून एकूण गुणांपैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना “आरोग्य संपन्न गाव” म्हणून घोषित करण्यात येईल. अशा गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या अभियानासाठी सुमारे ८०.७५ कोटी रुपयांच्या निधीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
ही योजना केवळ आरोग्य विभागापुरती मर्यादित नसून समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून उभी राहणारी लोकचळवळ ठरणार आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळण्यासह आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेला बळकटी मिळणार आहे.
सदर योजना यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
000000

Comments
Post a Comment