यवतमाळ येथे कायदेविषयक व श्रमदान शिबीर संपन्न

यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ, वरिष्ठ भुवैज्ञानिक कार्यालय, यवतमाळ आणि सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक व श्रमदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक एच. दाभाडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) होते. प्रमुख वक्ते म्हणून विश्वजीत पाउलबुद्धे, कनिष्ठ वैज्ञानिक, भुवैज्ञानिक कार्यालय, यवतमाळ आणि अनिकेत गादेकर, सहाय्यक भुवैज्ञानिक अधिकारी उपस्थित होते. तसेच सीमा शेठे, प्राचार्य, सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कल्पना राऊत यांनी केले. त्यांनी पाणी संवर्धनाचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले.माहिती दिली. विश्वजीत पाउलबुद्धे यांनी पाण्याचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना पाणी संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “पाणी अडवा, पाणी जिरवा” या उपक्रमाची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. त्यांनी नायट्रेट व फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. नायट्रेटमुळे लहान मुलांमध्ये ब्ल्यू बेबी सिंड्रोम होऊ शकतो, तर फ्लोराईडमुळे दात व हाडांचे आजार होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. अनिकेत गादेकर यांनी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे महत्त्व सांगितले. प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासून तसेच वॉटर ट्रीटमेंट प्रणालींचा वापर करून नायट्रेट व फ्लोराईड कमी करता येते, असे त्यांनी नमूद केले. दूषित पाण्याचा वापर टाळून पर्यायी स्रोत शोधण्याचेही त्यांनी आवाहन केले. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश दीपक दाभाडे यांनी केवळ कायदे तयार करून चालत नाही, तर त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. “माती अडवा, पाणी जिरवा” या संकल्पनेवर त्यांनी मार्गदर्शन केले. पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून भविष्यातील पिढ्यांसाठी पाणी जपणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. कल्पना राऊत यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …