आयुर्वेद महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा कायदेविषयक जनजागृती शिबीरातून महिलांना मार्गदर्शन
यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ आणि डॉ. मा. म. आयुर्वेद महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 9 मार्च रोजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच महिला हक्कांविषयी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये महिला हक्कांविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश दिपक एच. दाभाडे होते. प्रमुख वक्त्या म्हणून पॅनल वकील निलिमा जोशी उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाला डॉ. मा. म. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने यांनी प्रास्ताविक करत शिबिराचे उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रमुख वक्त्या श्रीमती जोशी यांनी महिलांचे हक्क, कायदेशीर संरक्षण आणि समाजातील त्यांचे स्थान याविषयी मार्गदर्शन करुन 8 मार्च हा दिवस केवळ एक दिवस साजरा न करता प्रत्येक दिवस महिला दिन म्हणून साजरा झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
तसेच त्यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005, हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा याबाबत सविस्तर माहिती दिली. कौटुंबिक हिंसाचार कायदा हा दिवाणी स्वरूपाचा असून त्यामध्ये थेट अटक होत नाही; मात्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास अटक होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
हुंड्यासाठी विवाहित महिलांवर होणारा छळ अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी मुलींनी हुंडा मागणाऱ्या वराकडील मंडळींना नकार देण्याचे आवाहन केले. महिलांवर होणाऱ्या अत्याचारामागे अशिक्षितपणा हेही एक महत्त्वाचे कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. हुंडा देणे-घेणे हे कायद्याने गुन्हा असून याबाबतच्या कायद्याच्या कलम 3 व 4 बाबतही त्यांनी माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात दिवाणी न्यायाधीश दिपक एच. दाभाडे यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी समाजात सन्मानाने जगावे व अन्याय-अत्याचाराला बळी पडू नये, असे त्यांनी सांगितले. यासह हुंडा प्रतिबंधक कायदा व कौटुंबिक हिंसाचार विषयी मार्गदर्शन केल. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कायद्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या संस्कृत प्राध्यापिका डॉ. दर्शना वरगंटिवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहयोगी प्राध्यापिका डॉ. प्रज्ञा घोरमोडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment