जिल्हा परिषदेत पोक्सो कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा केंद्रप्रमुखांसाठी विशेष प्रशिक्षण

यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी जिल्हा परिषद सभागृहात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अर्थात पोक्सो अधिनियम २०१२ या कायद्यावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या संकल्पनेतून व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, महिला व बाल विकास विभाग तसेच शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सभागृहात जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांसाठी या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कायद्याच्या तरतुदी, शिक्षकांची भूमिका तसेच बाल संरक्षण यंत्रणेची माहिती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शिका ॲड. ज्योती खांडपासोळे यांनी कायद्यांतर्गत गुन्ह्यांचे स्वरुप, शिक्षेच्या तरतुदी, पोलीस प्रशासन, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाइन आणि इतर शासकीय यंत्रणांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपस्थितांनी बालविवाह प्रतिबंधासाठी शपथही घेतली. या कार्यशाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वासुदेवराव डायरे, सदस्य अनिल गायकवाड व लीना आदे, शासकीय मुलांचे बालगृह व निरीक्षण गृहाचे अधीक्षक गजानन जुमळे तसेच परिविक्षा अधिकारी रवींद्र गजभिये उपस्थित होते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून भविष्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बाल लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी विविध उपाययोजना तसेच जनजागृती सत्रांचे आयोजन जिल्हा बाल संरक्षण कक्ष व शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तंत्रज्ञान आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होत असताना ही कार्यशाळा जिल्हा स्तरावर जनजागृती व क्षमता बांधणीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे स्वप्नील शेटे, महेश हळदे, माधुरी पावडे, आकाश बुर्रेवार आणि चाईल्ड हेल्पलाइनचे फाल्गुन पालकर, गणेश आत्राम, मनीष शेळके, पूजा शेलारे, पूनम कनाके, अश्विनी नासरे यांनी विशेष सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती