शिवशंभो गर्जना’तून संत-महापुरुषांचा जयघोष; यवतमाळ महोत्सवात भक्ती-देशभक्तीचा संगम
यवतमाळ, दि. 30 : यवतमाळ महोत्सवातर्गत सांस्कृतिक कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार अभिजित आणि अमू जाधव यांचा 'शिवशंभो गर्जना' हा गीतगायनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमातून संत, महापुरुष आणि राष्ट्रपुरुषांचा जयघोष घुमला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र मैदान, वाघापूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात शिव-गणेश आराधना, देशभक्तीपर गीते तसेच ‘दैवत छत्रपती’, ‘स्वराज्याचं धनी, माझं शिवबा राजा’ या गीतांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी इतिहासाला उजाळा देण्यात आला.
यावेळी शिवशंकर डमरू वादन, शिव आराधना, श्री विठ्ठल भक्तीगीत तसेच श्री स्वामी समर्थ आणि संत श्री गजानन महाराज यांच्या भक्तीगीतांनी वातावरण भक्तिमय झाले. संभळ आणि दिमडी या पारंपरिक वाद्यांच्या सादरीकरण केले.
या कार्यक्रमाला यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल गायकवाड आणि गणेश यांनी केले.
आज इंडियन आयडॉल फेम सलमान अली यांचा लाईव्ह कॉन्सर्ट
आज दिनांक ३० मार्च रोजी इंडियन आयडॉल विजेता गायक सलमान अली यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. या यवतमाळ महोत्सवातील प्रदर्शनीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.








Comments
Post a Comment