आयटीआयमध्ये अल्पमुदतीचे कौशल्य प्रशिक्षण
दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
यवतमाळ, दि.23 (जिमाका) : आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांनी नियमित शिक्षणासोबत तांत्रिक प्रशिक्षण घेऊन कौशल्य विकसित करणे अत्यावश्यक आहे. यासाठी शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) अल्पमुदतीचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.
या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा मार्च अखेर पूर्ण होत असून, दुसऱ्या टप्यातील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली आहे. यामध्ये तांत्रिक कौशल्यासोबतच व्यक्तिमत्व विकास तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगार तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना इंडस्ट्री मधील रोजगाराच्या संधी तसेच शासकीय कर्ज योजनांचे मार्गदर्शनही केले जाणार आहे. यासाठी प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.
https://msbsvet.edu.in/Registration/CandidateRegistration.aspx?P191
या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये तांत्रिक कौशल्याबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जाणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकांना उद्योग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि विविध शासकीय कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील विविध आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आर्णी येथे सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन टेक्निशियन, बाभूळगाव येथे फंडामेंटल ऑफ व ट्रॅक्टर ऑपरेटर, दारव्हा येथे हलकी मोटार वाहन चालक, ब्युटी थेरपिस्ट व इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक सोल्युशन, दिग्रस येथे वेब डेव्हलपर, घाटंजी येथे सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियन व गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
तसेच गुंज व कळंब येथे सोलर एलईडी टेक्निशियन, मारेगाव येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टंट, फिटर-मेकॅनिकल असेंब्ली, ऑटोमोटिव्ह इंजिन रिपेअर टेक्निशियन, सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन टेक्निशियन व इलेक्ट्रिकल टेक्निशियन, नेर येथे सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन टेक्निशियन व फिटर-फॅब्रिकेशन, पांढरकवडा येथे कोंबिंग ऑपरेशन, हलकी मोटार वाहन चालक, ब्युटी थेरपिस्ट व इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक सोल्युशन उपलब्ध आहेत.
पुसद येथे सोलर पंप टेक्निशियन, राळेगाव येथे सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन टेक्निशियन, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियन व ब्युटी थेरपिस्ट, उमरखेड येथे सेल्फ एम्प्लॉयड टेलर व दुचाकी सर्व्हिस टेक्निशियन, वणी येथे वेब डेव्हलपर, सोलर फोटोव्होल्टेइक टेक्निशियन, दुचाकी सर्व्हिस टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिशियन व हलकी मोटार वाहन चालक हे अभ्यासक्रम सुरू आहेत.
यवतमाळ येथे टर्निंग ऑपरेटर, ऑपरेटर व्हर्टिकल मशिनिंग, चारचाकी व दुचाकी सर्व्हिस टेक्निशियन आणि ब्युटी थेरपिस्ट, तर झरी जामणी येथे सोलर फोटोव्होल्टेइक टेक्निशियन, दुचाकी सर्व्हिस टेक्निशियन व हलकी मोटार वाहन चालक हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा व कौशल्यपूर्ण बनावे, असे आवाहन सहायक आयुक्त (कौशल्य विभाग) तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी नजीकच्या आयटीआय किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन, चौथा मजला, दारव्हा रोड, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
Comments
Post a Comment