सार्वजनिक सुट्टीतही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार
यवतमाळ, दि.१८ (जिमाका) : आर्थिक वर्ष अखेर जवळ आल्याने तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्या निर्देशानुसार दि. 26 मार्च, 28 मार्च, 29 मार्च व 31 मार्च 2026 या चार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत.
याशिवाय ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी शनिवार-रविवार वगळता इतर दिवशी असते, त्यांनी त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्ट्यांपैकी एक दिवस कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या काळात कामकाज सुरळीत पार पडावे, नियंत्रण व देखरेख राखली जावी आणि अभिनिर्णय तसेच अपूर्ण मुद्रांक शुल्काशी संबंधित कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये (मुंबई शहर व उपनगरांसह) देखील कार्यरत राहणार आहेत.
या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये तसेच सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय या चारही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा आणि आपल्या दस्तांची नोंदणी करून आवश्यक मुद्रांक शुल्क भरावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, यवतमाळ बाळासाहेब घोंगडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment