पुसद प्रकल्पस्तरीय कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहात
यवतमाळ, दि. 5 (जिमाका) : पुसद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या यशवंत रंग मंदिर मैदानावर २८ फेब्रुवारी रोजी पुसद प्रकल्पस्तरीय कर्मचारी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात व थाटात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून पुसद शहर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वीर बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. क्रीडा ध्वजारोहण व ज्योत प्रज्वलनानंतर रवी घड्याळे व एस.पी. हजारे यांनी कर्मचारी खेळाडू व पंचांना क्रीडा शपथ दिली.
यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल यांनी प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे सांगितले. सध्या देशभरात शुगर व बीपीसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य टिकविण्यासाठी खेळ आणि व्यायाम अत्यंत आवश्यक असल्याचे मत पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी व्यक्त केले. तर व्यायाम किंवा खेळात सातत्य ठेवणे महत्वाचे असून त्यासाठी आळस दूर करणे गरजेचे आहे, असे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी सांगितले.
या क्रीडा स्पर्धांसाठी प्रकल्पांतर्गत चार सांघिक गट तयार करण्यात आले होते. यामध्ये शासकीय आश्रमशाळा कर्मचारी, अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी, मुला-मुलींच्या वसतिगृहांचे कर्मचारी तसेच प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी यांचा समावेश होता. स्पर्धांमध्ये १०० मीटर, ४०० मीटर धावणे, थाळी फेक, गोळाफेक, भालाफेक, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, क्रिकेट, व्हॉलीबॉल अशा इनडोअर व आऊटडोअर खेळांचा समावेश होता.
शासकीय व अनुदानित शाळांचे कर्मचारी, वसतिगृहातील कर्मचारी तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील विजयी खेळाडू कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.कोटूरवार यांनी केले. संचालन नारायण राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन समाधान जाधव यांनी मानले. प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. पंच म्हणून सर्व क्रीडा शिक्षक व समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी मंचावर लेखाधिकारी विष्णू चव्हाण, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण अरुण चव्हाण, चटलेवाड, संदीप राऊत, कवडे, वंदना वानखेडे, श्रीमती नरवाडे, वीर, शिरीष मेतकर, डी. व्ही. आडे, रवि पवार तसेच शासकीय वसतिगृहांचे गृहपाल, शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, गृहपाल, मुख्याध्यापक तसेच नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
000000


Comments
Post a Comment