मॉडेल व्हिलेज उपक्रमातून गावाचा सर्वांगीण विकास शक्य
कुलगुरू डॉ. शरद गडाख
यवतमाळ, दि. १२ (जिमाका) : मॉडेल व्हिलेज संकल्पनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवून गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात एक गाव ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून विकसित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ अंतर्गत मॉडेल व्हिलेज उपक्रमात दत्तक घेतलेल्या महमदपूर(ता. बाभूळगाव) येथे ८ मार्च रोजी मान्यवरांनी भेट देऊन विविध कृषी उपक्रमांची पाहणी केली.
यावेळी संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक (संशोधन) डॉ. श्यामसुंदर माने, विभाग प्रमुख डॉ. नितीन कोष्टी, सहयोगी संशोधन संचालक डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दीपक कच्छवे, तालुका कृषी अधिकारी ऋतिका डेरे, सरपंच जिजाबाई गाडेकर, पोलीस पाटील रसिका मेश्राम, कृष्णाभाऊ ठाकरे आदी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान कृषी विज्ञान केंद्राने दत्तक घेतलेल्या महमदपूर या आदर्श गावामध्ये मागील तीन वर्षांत राबविण्यात आलेल्या कृषी तंत्रज्ञानामुळे गावकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ जाणून घेतली. तसेच गावामध्ये करण्यात आलेल्या तुती लागवड, तीळ लागवड, गहू व कापूस लागवड, दुग्ध व्यवसाय, दाल मिल, पोषण बाग (न्यूट्रिशन गार्डन), अवजार बँक आदी उपक्रमांची पाहणी करुन माहिती घेतली.
कुलगुरू डॉ. गडाख यांनी सांगितले की, मॉडेल व्हिलेज म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत महमदपूर या गावाची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये शेतीचा सर्वांगीण विकास, पिकांची उत्पादकता दुप्पट करणे, लागवड खर्च ५० टक्क्यांपर्यंत कमी करणे, प्रक्रिया मुल्यवर्धन यास प्रोत्साहन देणे तसेच एकात्मिक शेती प्रणाली अंतर्गत शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम संगोपन आदी पूरक व्यवसायांना चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या भेटीदरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने महमदपूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनही साजरा करण्यात आला. कुलगुरू व प्रमुख अतिथींच्या हस्ते पाच कृषी आधारित उद्योजक महिला शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांना उद्योजकता विकासासाठी प्रोत्साहित करत त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘अग्रिम’सारखे उपक्रम सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला. या कार्यक्रमास सुमारे ५० ते ६० महिला शेतकरी भगिनी उपस्थित होत्या.
मान्यवरांनी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथेही भेट देऊन कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची मासिक सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, सहायक प्राध्यापिका स्नेहलता भागवत, राहुल चव्हाण, डॉ. गणेश काळूसे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महमदपूर गावातील शेतकरी तसेच कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले.
000000


Comments
Post a Comment