2 लाख 90 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी वितरित
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 व्या हप्त्याचे वितरण
यवतमाळ, दि.17 (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील 22 वा हप्ता यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 3 लाख 7 हजार 175 नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी पात्र 2 लाख 90 हजार 926 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 13 मार्च रोजी वितरित करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात विविध कारणांमुळे किंवा अनवधानाने पोर्टलवर अपात्र करण्यात आलेल्या 56 हजार 357 लाभार्थ्यांपैकी 7 हजार 691 लाभार्थ्यांना पुन्हा पात्र करण्यात आले आहे. तसेच स्वयंनोंदणीकृत 8 हजार 482 लाभार्थ्यांना राज्य स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक असून ई-केवायसी पूर्ण न केल्यास 23 व्या हप्त्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या सेवा सरकार केंद्र किंवा सेतु केंद्रावर जाऊन अथवा सहाय्यक कृषी अधिकारी यांचे मार्फत ई-केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांचे आधार सिडींग झालेले नाही, त्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार लिंक करून घ्यावे. त्यासाठी संबंधित बँकेत भेट द्यावी किंवा पोस्ट बँकेचे खाते उघडून आधार सिडींग करून घ्यावे.तसेच ज्या लाभार्थ्यांचे लँड सिडींग झालेले नाही, त्यांनी महसूल विभागाशी संपर्क साधून लँड सिडींग करून घ्यावे. ज्या लाभार्थ्यांचे पीएम किसान खाते अनवधानाने अपात्र झाले आहे, त्यांनी सातबारा उतारा, फेरफार (1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची जमीन धारणा किंवा 1 फेब्रुवारी 2019 नंतर वारसा हक्क फेरफार), नमुना 8 अ, पती-पत्नीचे आधार कार्ड (आधार नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र) इ. कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment