यवतमाळ ग्रंथोत्सव उत्साहात साजरा

यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : ग्रामीण व शहरी भागांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने राज्य शासनामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ग्रंथप्रेमींना विविध प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे तसेच प्रकाशक व ग्रंथ विक्रेत्यांना व्यासपीठ मिळावे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यवतमाळ आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ ग्रंथोत्सव 2026 चे आयोजन कृषी विज्ञान केंद्र मैदान, पिंपळगाव रोड येथे 27 व 28 मार्च रोजी करण्यात आले. ग्रंथोत्सवाची सुरुवात 27 मार्च रोजी ग्रंथदिंडीने झाली. नगराध्यक्षा प्रियदर्शनी अशोक उईके यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी डॉ. राजेश पाटील (सहायक ग्रंथालय संचालक, अमरावती), किशोर पागोरे (शिक्षणाधिकारी, माध्यमिक), बाळासाहेब धांदे (व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था), स्मिता घावडे, कविता महाजन, प्रशांत पंचभाई, मनोज रनखाम, संजय कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत दिंडी उत्साहात पार पडली. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार संजय देरकर, आमदार किसन वानखेडे, नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आदी मान्यवर उपस्थित होते. 28 मार्च रोजी “शाश्वत ग्रामीण शेती आणि साहित्य : एक आंतरशाखीय दृष्टिकोन” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल होते. प्रा. अरविंद राठोड आणि प्रा. तोष्णा मोकडे यांनी चर्चासत्रात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले, सूत्रसंचालन प्रशांत पंचभाई यांनी केले तर आभार नवल कव्हळे यांनी मानले. यावेळी सेवा समर्पण प्रतिष्ठान, यवतमाळ येथील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ऑर्केस्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मराठी भावगीते, हिंदी-मराठी चित्रपट गीतांसह छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ग्रंथोत्सवाच्या समारोपप्रसंगी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षांद्वारे शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पुस्तके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब धांदे होते. विनोद देशपांडे, कविता महाजन, प्रशांत पंचभाई, संजय कोल्हे, मनोज रनखाम आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवल कव्हळे यांनी केले तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांनी मानले. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवासाठी नवल कव्हळे, शहूराज भोरे, प्रशांत पंचभाई, मनोज रनखाम, अनिल रामटेके, रमेश शेंडे, संजय कोल्हे, साहेबराव पवार, आरती कुमरे तसेच जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित