उमेद अभियानाने दिली नवी भरारी;
आदिवासी महिलांचा राष्ट्रपती भवनापर्यंत अभिमानास्पद प्रवास
यवतमाळ, दि. १3 (जिमाका) ग्रामीण भागातील महिलांनी जिद्द, संघटन आणि परिश्रमाच्या बळावर मोठे यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण यवतमाळ जिल्ह्यातील चार आदिवासी महिलांनी घालून दिले आहे. उमेद अभियानांतर्गत स्वयं-सहाय्य समूहात कार्यरत असलेल्या या महिलांना दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानाला भेट देण्याची संधी मिळाली. हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला.
राष्ट्रपती महोदय यांच्या कार्यालयाद्वारे अमृत उद्यान, राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे विशेष घटकाची भेट दि १० मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये देशातील प्रत्येक राज्यातून चार महिलांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये यवतमाळ जिल्हामधून कापरा येथील वर्षा कोमटी, भारी येथील संगीता गाडेकर, येरद येथील सुनंदा मेश्राम आणि येळाबारा येथील जिजा रामगडे या कोलाम आदिवासी समाजातील महिलाना उमेद अभियानाच्या माध्यमामधून सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. दिल्ली दौऱ्यात त्यांनी राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानासह इंडिया गेट, कुतुब मिनार, लाल किल्ला, राजघाट, जंतर मंतर आणि अक्षरधाम मंदिर आदी ऐतिहासिक स्थळांना भेट देत अविस्मरणीय अनुभव घेतला.
ग्रामीण भागातील साध्या कुटुंबातून आलेल्या या महिलांचा राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. उमेद, अभियानाच्या माध्यमातून स्वयं-सहाय्य समूहांद्वारे महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होत असून 'लखपती दीदी' अभियान, समुदाय गुंतवणूक निधी, फिरता निधी, कृषी व उपजीविका प्रकल्प तसेच कौशल्य प्रशिक्षण आदी उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे. या दौऱ्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, प्रकल्प संचाल आनंदराव पिंगळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर, जिल्हा व्यवस्थापक स्नेहा खडसे- यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर समन्वयक म्हणून प्रशांत चावरे यांनी विशेष भूमिका बजावली.


Comments
Post a Comment