जलयुक्त शिवार : धामणगावातील नाल्यांना आले नदीचे स्वरूप


* धामनगाव देव येथे जलयुक्तमधून 32 बंधारे
* आठ किमीचा नाला झाला नदीत रूपांतरीत
       यवतमाळ, दि. 25: दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव हे मुंगसाजी महाराजाच्या वास्तव्याने पावन झालेले जिल्ह्याचे एक महत्वाचे तिर्थक्षेत्र आहे. जलयुक्त शिवार अभियानातून मुंगसाजी महाराजांचे हे गाव आता जलयुक्त अभियानाचे जिल्ह्यातील प्रमुख गाव म्हणून ओळखू लागले आहे.
          दारव्हा शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या या गावात काही वर्षापूर्वी पंतप्रधान पॅकेजमधून 34 सिमेंटनाला बांध बांधण्यात आले होते. गावाशेजारी असलेल्या आणि शिवारातून आढेवेढे घेत जाणाऱ्या नाल्यांवर घेण्यात आलेले हे बंधारे गेल्या काही वर्षांपासून गाळाने भरून गेले होते. त्यामुळे या नाल्यांमध्ये पाणी कमी आणि गाळच अधिक अशी स्थिती काही वर्षात निर्माण झाली होती. त्यामुळे नाल्यात पाणी फार अल्प प्रमाणात साचून बाकी पाणी वाहून जात होते.
          पालकमंत्री संजय राठोड यांनी हे गाव दत्तक घेतल्यानंतर गावातील या जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढून खोलीकरणाचा व्यापक कार्यक्रम जलयुक्त शिवार अभियानातून घेण्यात आला. तब्बल 32 बंधाऱ्याची यासाठी निवड करण्यात आली. एका पाठोपाठ एक असलेले बंधारे अभियानातून गाळमुक्त तर झालेच शिवाय खोल आणि रुंदही झाले आहे. या मुळे नाल्यांची पाणी साठवणूक क्षमता वाढली.
          यावर्षी पावसाळ्यात जुनमध्ये झालेल्या पहिल्याच पाण्यात सर्व 32 ही बंधारे तुडुंब भरून वाहु लागले होते. एका बंधाऱ्यापासून दुसऱ्या बंधाऱ्यापर्यंत नाल्यात पाणी भरल्याने बंधाऱ्याचा संपुर्ण 8 किलोमीटर पर्यंतच्या भागास नदीचे रुप प्राप्‍त झाले आहे. नाल्या शेजारील पूर्ण 8 किलोमीटर परिसरातील आजूबाजूच्या 300 ते 600 मीटर अंतरावरील विहीरींची पातळी कमालीची वाढली आहे.
          या गावात पुर्वी पाण्याची फारच टंचाई होती. गावात लग्न किंवा अन्य मोठा कार्यक्रम असल्यास पाण्याचा प्रश्न प्राधान्याने उपस्थित व्हायचा. गावकऱ्यास टंचाईमुळे रोज पिण्याचे पाणी मिळत नव्हते. गावातील सलग 32 बंधाऱ्यांमुळे गावातील पाणी टंचाई कायमस्वरूपी निकाली निघाली असून शेतीसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण आहे.
गावाचा पाणी प्रश्न सुटला - सरपंच जगदीश जाधव
          धामणगाव मध्ये पूर्वी पाण्याची फार टंचाई होती. गावात लग्नकार्य असले की पिण्यासाठी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न पडायचा. नजीकच्या रामगाव रामेश्वर येथून आम्हास पाणी आणावे लागत होते. पंतप्रधान पॅकेजमधून गावात बंधारे झाले. यामुळे थोडाफार दिलासा मिळाला. यावर्षी जलयुक्त मधून 32 बंधाऱ्यातील गाळ काढण्यासोबतच खोलिकरण व रूंदीकरण करण्यात आले. यामुळे गावात शाश्वत सिंचनासह मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय झाली, असे धामणगाव देव येथील सरपंच जगदीश जाधव यांनी सांगितले.

0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी