अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

अनेकदा समाजात दारू आणि तंबाखू हेच अमली पदार्थ आहे असं समजलं जातं. परंतु आज समाजामध्ये भांग, गांजा, चरस, हीरोइन, एम.डी. पावडर यासारखे अमली पदार्थ आपल्या तरुणांच्या रक्तामध्ये दिसून पडतात. 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिवस. यानिमित्त अमली पदार्थाच्या सेवनामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम आणि व्यसमुक्तीची माहिती. किशोरवयाच्या उंबरठ्यावर प्रत्येक जण शारीरिक, भावनिक व मानसिक स्तरावर एका नव्या परिस्थितीचा अनुभव करत असतो. हे वय म्हणजे पाण्याच्या प्रवाहासारखे असतं. आयुष्याचा प्रत्येक क्षण उत्साहात, उमेदीत तर कधी उन्मादात व्यतीत होत असतो. किशोर वयामध्ये नवीन प्रयोग करण्याचे, धोके पत्करण्याची मानसिकता तरुणांमध्ये असते. कधी पार्टीच्या निमित्ताने, तर कधी मित्राच्या दबावाखाली, सहजच उत्सुकता म्हणून अथवा सिनेमातील हीरो हीरोइन चे अनुकरण करून तरूणाई एखाद्या अंमली पदार्थाचे सेवन करत व्यसनाधीन होतात. तारुण्याचे अमृत प्राशन करत असतांना कळत-नकळत व्यसनाचा प्याला हातात येतो. मग पुष्कळदा मानसिक तणाव, उदासीनता, याच्या प्रभावाखाली किंवा उत्साह वाढवण्यासाठी या पदार्थाचे सेवन केल्या जाते. काही जण आयुष्यातील कठीण प्रसंगाची पळवाट म्हणून तर काही कुतूहल म्हणून अमली पदार्थ सेवन करतात व हे व्यसन कधी आजारात रूपांतरीत होते याची त्यांना कल्पनाही नसते. यामुळे पुन्हा पुन्हा व्यसन करण्याची इच्छा, व्यसनाचे प्रमाण वाढणे, व्यसन न केल्यास झोप न लागणे, शरीराची थरकाप होणे, त्रास होणे, भीती वाटणे, भूक मंदावणे, चिडचिडपणा व शरिर आकडने असे लक्षणे दिसतात. अमली पदार्थाच्या वाढत्या सेवनामुळे मेंदूवरील दुष्परिणाम वाढीस लागतात, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, रक्तदाब वाढतो आणि लिव्हर व स्वादुपिंड निकामी पण पडतात. यालाच आपण व्यसनाधीनता म्हणतो. या स्तरावर जवळच्या लोकांना आजाराची लक्षणे जाणवू लागतात. रुग्णाच्या दैनंदिन जीवनात निर्णय क्षमतेत बदल दिसून येतात. बरेचदा नातेवाईक रुग्णांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. पण आजाराच्या वाढत्या इच्छाशक्तीसोबत व्यसनाधिनता तीव्र होत जाते. अशा वेळी नशेसाठी काही व्यक्ती चोरी करणे, खोटे बोलणे, फसवणूक करणे, भांडण करणे, राग आक्रमकता इत्यादीचे मार्गाचा अवलंब करतात. काहींमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते. अशा परिस्थितीत काही जण स्वतःला व इतरांना शारीरिक व आर्थिक नुकसान करू शकतात. या घातक अमली पदार्थाच्या आहारी जाऊन रुग्णाची बौद्धिक, भावनिक, शारीरिक व सामाजिक पातळी खालावते. अमली पदार्थ घेणारे व्यक्तीकडे समाज तिरस्काराने पाहतो. व्यसनाधीनतेच्या लक्षणाची योग्य वेळी जर ओळख झाली तर औषधी, मोटिवेशनल थेरपी व समुपदेशन, व्यसनमुक्ती केंद्राचा आधार यातून व्यसनमुक्ती शक्य आहे. उपचारादरम्यान सर्वात कठीण भाग म्हणजे व्यसन हा एक आजार आहे याची जाणीव करून देणे. यात मनोविकार तज्ञांची जणू परीक्षाच असते. या कारणांमुळे उपचार वेळखाऊ होतो नातेवाईकांचा संयम सुटण्याची शक्यता असते म्हणून अशा रुग्णांवर नुसताच व्यसनी असल्याचा ठपका न लावता, त्यांना आजारी व्यक्ती प्रमाणे मदत व मार्गदर्शन केल्यास त्यांच्या व्यसनमुक्तीचा तसेच स्वस्थ व आनंदी आयुष्याचा मार्ग सुकर करता येईल. - डॉक्टर विनोद जाधव मानसोपचार व व्यसनमुक्ती तज्ञ यवतमाळ. चौकट यवतमाळ जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी समिती गठीत करण्यात आली असून अमली पदार्थ विरोधात जनजागृती करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा मधील पिंपळखुटी व पाटण मधील दिग्रज या आंतरराज्यीय सिमावर्ती भागात तसेच कळमना, डाखोरी-बोरी, धनोडा आणी सायखेडा या आंतरजिल्हा हद्दीच्या ठिकाणी अमली पदार्थ तपासणी नाके स्थापीत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अमली पदार्थाचे वाहतुक, साठा विक्री व सेवन याविरूद्ध व्यापक स्तरावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस दल सुसज्ज करण्यात आले आहे. नागरिकांनी व्यसनाधीतेपासून आपल्या समाज बांधवांना वेळीच सावध करावे. - जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी