जिल्ह्यात रक्तदानाची चळवळ निर्माण व्हावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे

· महारक्तदान शिबीरातील रक्तदात्यांना दिल्या शुभेच्छा · रक्तदानातून एकतेचा संदेश यवतमाळ, दि 14 जून, (जिमाका) :- एका रक्तदात्यामुळे तीन जणांचे प्राण वाचू शकतात. सिकलसेल, थालेसिमीया किंवा अपघातग्रस्त तसेच शल्य चिकित्सेच्या गंभीर रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची गरज असते. रक्ताची ही गरज भागविणे व जास्तीत जास्त रक्तदाते निर्माण होवून रक्तसंकलनात वाढ व्हावी यासाठी जिल्ह्यात रक्तदान चळवळीचे वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज महारक्तदान शिबीरात व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 14 जून या जागतीक रक्तदाता दिवसाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनातर्फे सामाजिक संस्थांच्या मदतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे आज महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, रेडक्रॉस सोसायटीचे सचिव जलालुद्दिन गिलाणी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की रक्ताला जातीधर्म नसतो. रक्तदानातून सर्वांना एकतेचा संदेश दिल्या जातो. जागतिक आरोग्य संघटनेने रक्तदान करा, एकतेचा संदेश द्या व रूग्णाचे प्राण वाचवा असा संदेश आजच्या दिवसानिमित्त दिला आहे. हा संदेश आपल्याला वर्षभर आपल्या रक्तदात्याच्या भूमिकेतून जपायचा आहे. हा आठवडा आपण जागतिक रक्तदाता आठवडा म्हणून साजरा करणार असून या आठवड्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान केल्यानंतर 48 तासात आपले शरीर संपुर्ण रक्त पुनप्राप्त करून घेते व तीन महिन्यानंतर आपल्याला पुन्हा रक्तदान करता येते. त्यामुळे रक्तदानाचे गैरसमज दुर करून त्याचे फायदे नागरिकांपर्यंत पोहचावे व तरूण पिढीत रक्तदानाविषयी जनजागृती वाढविण्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे त्यांनी सांगितले. वटपौर्णिमेच्या दिवशी रक्तदान करून महिलांनी एक चांगला संदेश समाजात दिला असल्याचे व महिलादेखील रक्तदानात मागे नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. आजचा दिवस रक्तदात्यांचा असल्याचे सांगून त्यांनी रक्तदान करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच आजच्या प्रथम रक्तदात्या सिमा उके तसेच श्रृतीका, आर्या राऊत, प्रिया ठोकळ यांच्यासह रक्तदान करणाऱ्या महिलांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा त्यांनी सत्कार केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रक्तदानातून सामाजिक बांधीलकीची जाण दर्शविण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागात रूग्णांना वेळेवर रक्त पुरवठा व्हावा यासाठी उपजिल्हा रूग्णालयाच्या ठिकाणी पुरेसा रक्तसाठा राहील याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. अपर जिल्हा पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी देखील याप्रसंगी रक्तदानाचे महत्व व कार्यक्रमाचे आयोजनाबाबत माहिती दिली. आजच्या रक्तदान शिबीरात एकूण 358 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यात 331 पुरूष व 27 महिलांचा समावेश होता. निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, पत्रकार नितीन पखाले, प्रा.घनशाम दरणे यांचेसह एकूण पाच कुटूंबांनी सपत्नीक रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे आयोजनात महत्वपुर्ण योगदानाबद्दल उपजिल्हाधिकारी श्री. वऱ्हाडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक मनिषा चव्हाण यांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. घन:शाम दरणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रेडक्रॉस सोसायटीचे सचिव जलालुद्दिन गिलाणी यांनी व्यक्त केले. आजच्या महारक्तदान शिबीरात सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालय, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, संकल्प फाऊंडेशन, निस्वार्थ सेवा फाउंडेशन, शक्ती फाऊंडेशन, माजी सैनिक संघटना, महसूल कर्मचारी संघटना, प्रयास, राज्य कर्मचारी संघटना, प्रतिसाद फाउंडेशन, नंदादीप फाऊंडेशन, होमगार्ड पथक, एक हात आपुलकीचा, चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिज, जिम असोसिएशन, एन.सी.सी. विंग, आपले सरकार सेवा केंद्र संघटना, एम.आय.डी.सी., आधार रूग्ण सेवा समिती, संताजी रिसर्च फाउंडेशन यांचेसह विविध सामाजिक संस्था, शासकीय संघटना व नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदविला होता. 0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी