अध्ययन स्तरात वृद्धीसाठी शिक्षकांनी सुक्ष्म नियोजन करावे

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिक्षकांना दिल्या सूचना शिक्षकांच्या सांघीक प्रयत्नातूनच गुणवत्तापुर्ण विद्यार्थी घडतील Ø जिल्हा प्रशासनातर्फे शिक्षकांसाठी ‘प्रेरणा कार्यशाळा’ Ø ‘यशस्वी शिक्षक.. आदर्श विद्यार्थी.. आदर्श शाळा..’ ही संकल्पना Ø 16 तालुक्यातील शिक्षकांसाठी चार दिवस प्रशिक्षणाचे आयोजन Ø प्रथमच सर्व प्राथमिक व माध्यमीक शाळांचे शिक्षकांना एकत्रित प्रशिक्षण Ø जिल्हा परिषद, नगरपरिषद, आश्रमशाळा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शाळेचे शिक्षक उपस्थित Ø यावर्षी शिक्षकांसाठी ‘झेप’ हा उपक्रम राबविण्यात येणार यवतमाळ, दि 23 जून, (जिमाका) :- शिक्षकांच्या सांघीक प्रयत्नातूनच जिल्ह्यात गुणवत्तापुर्ण विद्यार्थी घडणार असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरात वृद्धी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे व जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात अधिक सक्षमतेने योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले. निपूण भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वाढवून एकंदर शैक्षणिक पातळी उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शिक्षकांसाठी प्रेरणा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, संमोहन तज्ञ व प्रेरक वक्ता नवनाथ गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रमोद सुर्यवंशी, डायटचे प्राचार्य प्रशांत गावंडे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी प्रामुख्याने उपस्थित होते. ‘यशस्वी शिक्षक.. आदर्श विद्यार्थी.. आदर्श शाळा..’ या संकल्पनेवर शिक्षकांसोबत संवाद साधून त्यांना शाळा सुरू होण्यापुर्वी काय नियोजन करायचे आहे याची माहिती देण्यासाठी या प्रेरणा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. शैक्षणिक क्षेत्रात कमी कार्यक्षमतेचा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख पुसून शिक्षणात अग्रेसर जिल्हा ही यवतमाळची नवीन ओळख निर्माण करण्याचा संकल्प शिक्षकांनी करावा. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांप्रती आपली जबाबदारी ओळखून पुढील पीढी घडविण्यासाठी योग्य नियोजन करावे, चांगले आदर्श निर्माण करण्यासाठी आपल्यात आवश्यक सुधारणा करावी व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिक्षकांना दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी वाढविण्यावर फोकस करण्याचे व त्यासाठी प्रत्येक शाळेने कृती योजना व स्कूल ॲक्शन प्लॅन तयार करून राज्यात यवतमाळ जिल्हा एक नंबरवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे सांगितले. मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या ‘महादीप’ या योजनेप्रमाणेच यावर्षी शिक्षकांसाठी ‘झेप’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. चांगला समाज घडविण्यात शिक्षकांची महत्वाची भूमिका असून आजच्या प्रेरणा कार्यशाळेतून प्रेरणा घेत विद्यार्थी घडविण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याच्या सूचना डॉ. पांचाळ यांनी दिल्या. याप्रसंगी शिक्षकांचा मानसिक ताण कमी करण्याकरीता सुप्रसिध्द संमोहन तज्ञ व प्रेरक वक्ता नवनाथ गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शिक्षकांनी समारात्मक विचाराधारेचा प्रथम स्वत: अंगिकार करून ती सकारात्कता विद्यार्थ्यांमध्ये रूजवावी व त्यांचे मनोबल वाढविण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात प्रथमच सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमीक शाळांचे शिक्षकांना एकत्रित प्रशिक्षण देण्यात येत असून यात जिल्हा परिषद, नगरपरिषद, आश्रमशाळा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शाळेचे शिक्षक यांची उपस्थिती आहे. या कार्यशाळेअंतर्गत दिनांक 22 जून रोजी यवतमाळ, बाभुळगाव, नेर व दिग्रस, 23 जून रोजी दारव्हा, कळंब, राळेगाव व आर्णी, दिनांक 24 जून रोजी पुसद, उमरखेड व पांढरकवडा तसेच 25 जून रोजी घाटंजी, महागाव, झरी, वणी व मारेगाव या तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण येथील वादाफळे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. प्रेरणा कार्यशाळेत चार दिवस दररोज 1700 ते 1800 शिक्षकांची उपस्थिती राहणार आहे. कार्यशाळेत शिक्षकांना निपुण भारत योजना, शाळा पुर्व तयारी (विद्या प्रवेश), पुनर्रचित सेतू अभ्यास, झेप, बाला, महादीप योजना, अध्ययन स्तर निश्चिती व कृती आराखडा, एल.पी.डी. पोर्टल, राष्ट्रीय संपादणूक चाचणी विश्लेषन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी विस्तार अधिकारी डॉ. किशोरी शर्मा, डॉ. वनिता ठाकरे, किरण रापतवार, विजयसिंह राठोड, सारिका पवार, प्रणिता गाढवे, बजरंग बोडके यांचेसह साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षण अंतर्गत फिरते शिक्षक व सर्व शाळांचे शिक्षक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी