सोयाबीन व तूर पेरणीची अमरपट्टा पद्धत प्रयोगशील शेतकरी केशवराव भगत यांचा उत्पन्नवाढीसाठीचा प्रयोग

यवतमाळ, दि 16 जून, (जिमाका) :- जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी करतात. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तूर पिकाची पेरणी न करता अमरपट्टा पद्धतीने येत्या खरीप हंगामात पेरणी करून तूर व सोयाबीनच्या उत्पन्नात सव्वा ते दीडपट वाढ करावी आणि बियाणे, किटकनाशके व मशागतीवर होणारा खर्च वाचवावा, असे आवाहन प्रयोगशील शेतकरी आणि अमरपट्टा पद्धतीचे जनक केशवराव भगत यांनी केले आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर जवळील चांभई शिवारात अकरा वर्षांपूर्वी प्रयोगशील शेतकरी असलेल्या केशवराव भगत यांनी सोयाबीन व तूर पिकाच्या पेरणीचा हा प्रयोग केला. आणि या पीक पेरणी पध्दतीला त्यांनी नाव दिले अमरपट्टा. अर्थात जो कधीही मरणार नाही तो अमरपट्टा. अमरपट्टा पध्दतीने सोयाबीन व तूर बियाण्यांची पेरणी करतांना सात दाती पेरणी यंत्रातील तूरीच्या बॉक्सच्या आजूबाजूचे दोन्ही बॉक्स बंद करण्यात येतात. त्यामुळे तूरीच्या दोन्ही बाजूला अडीच फुटाची मोकळी जागा शिल्लक राहून त्याच्या बाजूला सलग चार ओळी सोयाबीनच्या येतात. त्यांचे हे सोयाबीन व तूर पीक पेरणीच्या तंत्राचे अनुकरण सुरुवातीला मोजक्याच शेतकऱ्यांनी करून अमरपट्टा पद्धतीने सोयाबीन आणि तूर पिकाची पेरणी केली. या पद्धतीतून त्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि तूर उत्पादनात दीड ते दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले. बियाण्यांचा, मशागतीचा आणि कीटकनाशके फवारणीचा खर्चही कमी आला. केशवराव भगत यांच्या अमरपट्टा पद्धतीने सोयाबीन या मुख्य पिकात आंतरपीक म्हणून तूर पिकाची पेरणी करण्यात येते. पेरणी यंत्राच्या साह्याने सोयाबीन आणि तूर पिकाची पेरणी करतांना पेरणी यंत्राच्या पाईपच्या माध्यमातून बियाणे जमीनीत पडतात. जमीनीत बियाणे पडण्याची पेरणी यंत्राची रेंज ही 30 इतकी ठेवण्यात येते. पेरणीसाठी पेरणी यंत्राच्या बॉक्समध्ये (डब्बा) तूरीच्या डब्यामध्ये एका एकरसाठी दोन ते अडीच किलो तूर आणि दोन्ही बाजूच्या डब्यामध्ये सोयाबीन टाकून एकरी 20 किलो सोयाबीन बियाण्यांचा वापर करण्यात येतो. त्यामध्ये आवश्यकता असल्यास तूरीच्या बॉक्समध्ये तीन किलो मिश्र खत देखील टाकता येते. पेरणी यंत्रामध्ये सोयाबीन व तूरीची पेरणी करण्यासाठी सात दातांचा उपयोग होतो. तूरीची पेरणी केल्यानंतर दोन्ही बाजूची अडीच फुट जमीन मोकळी सोडल्या जाते. त्यानंतरच्या दोन्ही बाजूच्या 4 ओळीमध्ये सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली जाते. 30 दिवसानंतर तूरीच्या झाडाची शेंडे खुडणी व विरळणी करण्यात येते. विरळणी करतांना हलकी मध्यम जमीन असेल तर 1 फुट अंतरात 2 ते 3 तूरीची रोपे, सुपीक जमिन असेल तर एक फुटात 1 ते 2 रोपे ठेवण्यात येतात. एक एकर क्षेत्रात तूरीच्या 10 ते 12 हजार रोपांची पेरणी करण्यात येते. तूरीच्या दोन्ही बाजूला असलेल्या अडीच फुट मोकळया जागेत एकरी 20 किलो खताची मात्रा पुन्हा देण्यात येते. खताची मात्रा तूरीला दिल्यामुळे तूरीचे पीक चांगले बहरते. 60 दिवसानंतर पुन्हा तूरीची शेंडे खुडणी करुन तूरीच्या बाजूला असलेल्या मोकळया जागेत एकरी 20 किलो प्रमाणे खताची मात्रा देण्यात येते. त्यानंतर कोळपणी करुन तेथे पाणी देण्यात येते. तूरीला पाणी दिल्यामुळे ती आणखी बहरते व तूरीच्या ओळीतील ओलावा कायम राहून त्याचा फायदा तूरीच्या दोन्ही बाजूला असलेल्या सोयाबीन पिकाला होतो. आवश्यक तेंव्हा तणनाशके मारण्यात येतात. त्यामुळे तणाचे प्रमाण कमी होते. कृषी तज्ञांच्या सल्ल्याने योग्यवेळी तूरीवर किटकनाशकांची फवारणी करण्यात येते. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव 50 टक्के कमी होतो. शेतकऱ्यांनी पेरणी आधी बियाण्यांची उगवण क्षमता देखील तपासून घेतली पाहिजे. तुरीच्या दोन्ही बाजूला अडीच फुट जागा मोकळी सुटल्याने सोयाबीनला भरपूर सुर्यप्रकाश आणि खेळती हवा मिळत असल्यामुळे सोयाबीनवर बुरशीजन्य रोग कमी प्रमाणात येतात. या मोकळ्या जागेत मित्र किटकांचा आणि पक्षांचा सोयाबीनमध्ये वावर वाढल्यामुळे 50 टक्के किटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. अंतर मशागत करणे देखील सोयीचे होते. अमरपट्टा पध्दतीतून सोयाबीन आणि तूर पिकाची पेरणी केल्यास सोयाबीनचे उत्पन्न एकरी 9 ते 10 क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक तर तूरीचे उत्पन्न एकरी 10 क्विंटलच्या जवळपास घेता येते, असा काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पारंपारिक पध्दतीने सोयाबीनचे एकरी उत्पन्न 6 ते 7 क्विंटल तर तूरीचे एकरी उत्पन्न 5 ते 6 क्विंटल होते. अमरपट्टा पध्दतीने केशवराव भगत यांनी तूर आणि सोयाबीन पेरणीची ही एक नवीन पध्दत विकसीत केली आहे. त्यांच्या या प्रेरणेतून विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तसेच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील काही शेतकरी सुध्दा मागील काही वर्षापासून अमरपट्टा पध्दतीने शेती करुन तूर व सोयाबीन पिकाचे वाढीव उत्पन्न घेत आहे. त्यांचा हा प्रयोग राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रत्यक्ष त्यांच्या चांभई येथील शेतीला भेट देवून बघितला आहे. एवढेच नव्हे तर श्री. डवले यांनी देखील त्यांच्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतीत तूर व सोयाबीन पिकाची अमरपट्टा पध्दतीने पेरणी करुन उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या संपूर्ण शेतीत अमरपट्टा पध्दतीने तूर व सोयाबीन पिकाची पेरणी न करता सुरुवातीला प्रयोग म्हणून केवळ दोन एकर शेतीत अमरपट्टा पध्दतीने तूर व सोयाबीन पिकाची पेरणी करावी. या पध्दतीतून तूर आणि सोयाबीन पिकाचे वाढलेले उत्पन्न लक्षात घेऊन उर्वरीत क्षेत्रात देखील तूर व सोयाबीन पिकाची पेरणी अमरपट्टा पध्दतीने करुन आपल्या उत्पन्नात वाढ करावी. वाढते सोयाबीन बियाण्यांचे दर लक्षात घेता आणि शेतीला मशागतीसाठी आता मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण झाले असतांना कमी बियाण्यात, कमी मशागतीत तसेच किटकनाशकांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी बांधवानी अमरपट्टा पध्दतीने तूर व सोयाबीन पिकाची पेरणी करावी. तसेच शेतकऱ्यांनी केवळ पाऊस पडला म्हणून पेरणीला सुरुवात न करता हवामान खात्याचा अंदाज घेऊन कृषी विद्यापिठ व कृषी विभागाच्या मार्गदर्शनात योग्यवेळी पेरणी करावी त्यामुळे नुकसान होणार नाही. असे आवाहन प्रयोगशील शेतकरी तथा तूर आणि सोयाबीन पिकाच्या अमरपट्टा पध्दतीचे जनक केशवराव भगत यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी