रुंद सरी वरंबा तंत्रज्ञान वापर मोहीम

 



 

यवतमाळ, दि 2 जून, (जिमाका) :-   पीक उत्पादनासाठी जमीन व पाणी  या नैसर्गिक साधन संपत्ती  बरोबरच पीक व्यवस्थापन ही बाब अत्यंत महत्वाची आहे. पिक व्यवस्थापनेत पिकाची लागवड पध्दत महत्वाची आहे. बदलते हवामान व अनियमित पर्जन्यमुळे उत्पादनावर मोठा परिणाम दिसुन येते. याकरीता कमी कालावधीत पडणाऱ्या पर्जन्यमानाचे नियोजन पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेमध्ये योग्य पध्दतीने हेाणे गरजेचे आहे. या करीता मुलस्थानी जलसंधारण करणे महत्वाचे असून यासाठी बी.बी.एफ. (रुंद सरी वरंबा) पध्दतीने लागवड हे एक उपयुक्त तंत्रज्ञान आहे. विशेषत: अवर्षणप्रवण क्षेत्रात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी जास्त उपयुक्त ठरत आहे.

खरीप हंगामात सोयाबीन, भुईमुंग, तुर, मुंग, उडीद व मका या पिकांची व रब्बी  हंगामात हरबरा पिकाची या तंत्रज्ञानाद्वारे पेरणी करता येते. या तंत्रज्ञानाच्या वापराने निवीष्ठा खर्चात बचत होत असल्याने व उत्पादनात सर्वसाधारणपणे 20-25 टक्के वाढ होत असल्याची बाब निदर्शनास आली असल्याने या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांकडुन अवलंब होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने  बी.बी.एफ रुंद सरी वरंबा तंत्रज्ञानाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

बी.बी.एफ रुंद सरी वरंबा तंत्रज्ञान वापराचे प्रकार : 

·       बी.बी.एफ पेरणी यंत्राचा वापर करून रुंद सरी वरंबा काढणे.

·       पारंपारीक पेरणी यंत्राद्वारे पेरणी करून पेरणीपश्चात मृत सरी काढणे.

बी.बी.एफ रुंद सरी वरंबा तंत्रज्ञान वापराबाबतचे फायदे :

·       बी.बी.एफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्याने मुलस्थानी जलसंधारण होण्यास मदत होते.

·       बी.बी.एफ तंत्राव्दारे आंतरपीक पध्दतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन घेणे शक्य होते.

·       बी.बी.एफ पध्दतीने बियाण्यामध्ये 20 ते 25 टक्के बचत होत असल्याने निविष्ठा खर्चात बचत होते. तसेच उत्पान्नामध्ये 30 टक्के वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

·       बी.बीं एफ पध्दातीने वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने पर्जन्यमान खंडाच्या कालावधीत सुध्दा पाण्याच्या तानाची  तिव्रता कमी होते.

·       जास्त पर्जन्यमान झाल्यास या पध्दतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते.

·       बी.बी.एफ तंत्रज्ञानाद्वारे पिक घनता योग्य ठेवण्यास मदत झाल्याने पिकास मुबलक हवा, सुर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ हेाऊन पिक कीड रोगास पिक बळी  पडत नाही.

·       या पध्दतीचा अवलंब केल्याने जमिनीची धूप कमी प्रमाणात होते.

तरी सर्व शेतकऱ्यांनी 1 जून 2022 पासून खरीप हंगाम पेरणी कालावधी दरम्यान रुंद सरी वरंबा तंत्रज्ञानविषयी प्रचार प्रसिध्दी मोहीमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी