पी.एम. किसान योजनेंतर्गत बँक खात्याची इ-के.वाय.सी. पुर्ण करा जिल्हाधिकारी यांचे लाभार्थी शेतकऱ्यांना आवाहन

Ø इ-के.वाय.सी. पूर्ण करण्याकरिता 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ Ø इ-के.वाय.सी. साठी ओ.टी.पी. मोड व बायोमेट्रीक मोड या दोन पद्धती Ø इ-के.वाय.सी. पूर्ण करणेकरिता सुशिक्षीतांनी शेतकऱ्यांना करावी मदत यवतमाळ, दि 23 जून, (जिमाका) :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी लाभाचे हप्ते सुरळीत बँक खात्यात जमा होण्याकरिता त्यांचे बँक खाते इ-केवायसी करणे बंधनकारक असून सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे खात्याची इ-केवायसी पुर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी 2019 पासुन सुरु केली आहे. आजरोजीपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३लाख ५३ हजार १७१ शेतकऱ्यांची नोंदणी पी.एम. किसान सन्मान निधी पोर्टलवर करण्यात आलेली आहे. लाभाचे हप्ते सर्व पात्र नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता लाभ प्राप्तीची प्रक्रीया सुलभ व सुरळीत होण्याच्या उद्देशाने सर्व पात्र लाभार्थ्यांचे इ-केवायसी करणे केंद्र शासनाने बंधनकारक केले आहे. इ-केवायसी ची निकड व आजरोजी पर्यंत इ-केवायसी करिता प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता इ-केवायसी पूर्ण करण्याकरिता दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पी. एम. किसान सन्मान निधी योजने अंतर्गत इ-के.वाय.सी. करण्याकरीता पुढील दोन पद्धतीचा अवलंब करता येईल. १) ओ.टी.पी. मोड :- या प्रक्रिये मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर किंवा पी. एम. किसान ॲप द्वारे लाभार्थ्याला स्वत: किंवा संबंधित कर्मचा-यांकडून मोफत इ-के.वाय.सी.करता येईल. ओ.टी.पी. पध्दतीने इ-के.वाय.सी. करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे :- १. सर्वप्रथम, पी एम किसान सन्मान निधी https://pmkisan.gov.in च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. त्यानंतर “फार्मर कॉर्नर” अंतर्गत “इ-के.वाय.सी.” सुविधा निवडा. २. पुढे तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि सर्च बटन वर क्लीक करा. त्यानंतर डाटा व्हेरीफीकेशनची प्रक्रिया होईल. ३. आपला आधारकार्डला नमुद मोबाईल क्रमांक किंवा कुटूंबातील इतर कोणत्याही सदस्याचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा व "गेट मोबाईल ओ.टी.पी. " या बटनवर क्लीक करा. ४. त्यांनतर ओ.टी.पी. प्राप्त होईल, प्राप्त झालेला ओ.टी.पी. प्रविष्ट करा “सबमीट ओ.टी.पी.” वर क्लीक करा. ५. “ गेट आधार ओ.टी.पी. " बटन कार्यान्वीत होईल त्यावर क्लीक करा तदनंतर आधार “ओ.टी.पी. ” तुमच्या मोबाईल क्रमांकावर येईल तो “ओ.टी.पी.” पोर्टलवर प्रविष्ट करा. ६. त्यानंतर “सबमीट फॉर ऑथ” या बटन वर click करा. ७. काही क्षणातच “ इ-के.वाय.सी. इज सक्सेसफुली सबमीटेड” असा संदेश दिसून येईल. ८. अशा पध्दतीने इ-के.वाय.सी. ची प्रक्रिया पूर्ण होईल. सदर पध्दतीने इ-के.वाय.सी. ची प्रक्रिया पूर्ण करणेकरिता गावातील महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, सुशिक्षित कामगार, व्यवसायिक इत्यादींनी शेतक-यांना या कामी मदत करावी असे आवाहन जिल्ह्याधिकारी यांनी केले आहे. तसेच गावामध्ये 50 टक्केपेक्षा जास्त कुटूंबांकडे स्मार्ट फोन असल्याचे दिसून येते. स्मार्ट फोन व इंटरनेटची सुविधा असलेल्या नागरिकांनी स्वत: इ-के.वाय.सी. करून इतर शेतक-यांना या कामी मदत करावी असे देखील आवाहन जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना केले आहे. २) बायोमेट्रीक मोड :- या प्रक्रीये मध्ये नजीकच्या नागरी सेवा केंद्र केंद्रावर जावुन इ-के.वाय.सी. करता येईल, यासाठी शुल्क रूपये १५ फक्त आकारणी करण्यात येते. सदर पध्दतीने इ-के.वाय.सी. ची प्रक्रिया पूर्ण करणेकरिता नागरी सेवा केंद्र तथा आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी शेतक-यांच्या सोयीसाठी गावामध्ये सरपंचामार्फत पूर्व कल्पना देऊन ग्रामपंचायत व इतर सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी उपस्थित राहून इ-के.वाय.सी. कामी शेतकऱ्यांना मदत करावी. ज्या पात्र शेतक-यांची इ-के.वाय.सी. पध्दत क्रमांक १ नुसार होणे शक्य नाही अशा पात्र शेतक-यांची इ-के.वाय.सी. पध्दत क्रमांक २ नुसार करण्यात यावी. जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी पुढाकार घेऊन गावातील इ-के.वाय.सी. करणे बाकी असणा या सर्व पात्र लाभार्थ्यांची इ-के.वाय.सी. पध्दत क्रमांक १ व २ नुसार करून घेण्यात यावी. पध्दत क्रमांक १ मध्ये आवाहन केलेल्या सर्व स्वयंसेवक यांना आवाहन करून इ-के.वाय.सी. चे गावामध्ये प्रात्याक्षिक ठेवून इ- के.वाय.सी. चे कामी सर्व पात्र शेतक-यांना मदत करून 100 टक्के इ-के.वाय.सी. पूर्ण करून घेणे तसेच पध्दत क्रमांक १ नुसार इ-के.वाय.सी. करणे शक्य नसलेल्या पात्र लाभार्थ्यांची पध्दत क्रमांक २ नुसार इ-के.वाय.सी. करण्याकरिता सी एस सी केंद्र चालक / आपले सरकार केंद्र चालकांशी समन्वय साधून इ-के.वाय.सी. पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी