राजर्षी शाहु महाराजांचे विचार समाजात रूजवण्याचा निश्चय करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Ø शाहू महाराजांचे जीवन म्हणजे चालतेबोलते विद्यापीठच Ø विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचे चारित्र्य समजून घेत त्याचा अंगीकार करावा Ø परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शिक्षणाचा करा वापर यवतमाळ, दि 26 जून, (जिमाका) :- राजर्षी शाहू महाराजांनी जनहितासाठी घेतलेल्या निर्णयामुळे रयतेचा राजा म्हणून त्यांची ओळख झाली. सक्तीचे प्राथमिक शिक्षण, स्री-पुरूष समानता, महिलांना मताधिकार, आंतरजातीय विवाह यासारखे अनेक निर्णयातून काळाच्या पुढे जात त्यांनी समाजात समता प्रस्तापित करण्याचे कार्य केले आणि पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी व अंमलबजावणी त्याकाळी केली. आजच्या पिढीने सामाजिक समतेचा वारसा पुढे नेण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार समाजात रूजवण्याचा निश्चय करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले. राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जात पडताळणी समितीचे उपायुक्त दिलीप राठोड, डायटचे प्राचार्य प्रशांत गावंडे याप्रसंगी व्यावपीठावर उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की इतर प्रगत देशातील मोठमोठ्या विचारवंतांनी जो काही एक-एक विचार मांडून त्याचे विश्लेषन केले, त्या विविध विचारवंतांच्या सर्व विचारांची अंमलबजावणी शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यकारभारात केली. कोणतेही क्षेत्र त्यांनी सोडले नाही. शिक्षण क्षेत्र सर्व समाजासाठी खुले केले, मागे राहीलेल्या समाजाला पुढे आणण्याची कार्यवाही केली, धरण बांधले, शासन प्रशासन हे जनतेचे सेवक असल्याचे शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. कला, संगीत, कुस्ती, खेळ अशा प्रत्येक क्षेत्राला राजाश्रय देण्याचे काम त्यांनी केले. एक आदर्श शासन व्यवस्था निर्माण केली. अमेरिकेत देखील नसलेले स्री-पुरूष समानता, स्रीयांना मतदानाचा अधिकार, सामाजिक समतेची अंमलबजावणी त्यांनी त्याकाळी आपल्या राज्यात केली. शाहू महाराजांचे जीवन म्हणजे चालतेबोलते विद्यापीठच आहे. सुजाण नागरिक बनण्यासाठी तसेच आपले विचार प्रगल्भ करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचे चारित्र्य समजून घेत त्याचा अंगीकार करावा. आपल्या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शिक्षण या साधनाचा वापर करण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी राजर्षी शाहू महारांचे विचार आचरणात आणण्याचे व आपल्या ऐतिहासिक धरोहरचा अभिमान बाळगण्याचे सांगितले. नवीन पीढीने त्यांच्या निवडीच्या क्षेत्रात मुळ गाभा मजबूत करावा व जीवनात नवनवीन मार्गाचे निर्माण करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डायटचे प्राचार्य गावंडे यांनी राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी प्रास्ताविकेतून सामाजिक न्याय दिनाची माहिती दिली. तत्पुर्वी समता दिनानिमित्त महात्मा ज्योतीबा फुले पुतळ्यापासून सामाजिक न्याय भवन पर्यंत समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकारी अमोल येडगे व पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आजाद मैदान येथे हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कमल राठोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार जात पडताळणी समितीच्या सचिव मंगला मून यांनी व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक न्याय योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेच्या लाभाचे वाटप करण्यात आले. वेदिका जाधव या मुलीने इयत्ता दहावीत 100 टक्के गुण प्राप्त केल्याने तीचा व तीचे पालक तसेच शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, श्री. नरोटे, श्री. भोयर, गौरव गावंडे, तसेच कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी