मौजे वडद (ब्रम्ही) येथील पाणी पुरवठा योजनेचा सीईओनी घेतला आढावा

Ø नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश Ø जलशुध्दीकरण यंत्र तातडीने दुरूस्त करण्याचे निर्देश Ø पाणी नमुने तपासणीत फ्लोराईडचे प्रमाण सामान्य Ø किडणी रूग्णांची नियमित तपासणी व समुपदेश करणार यवतमाळ, दि 10 जून, (जिमाका) :- महागाव तालुक्यातील मौजे वडद (ब्रम्ही) येथे पिण्याच्या पाण्याची समस्येची दखल घेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी येथील पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला व या गावातील पाण्याची भावी गरज भागविण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत तात्काळ नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे यांना दिले. मौजे वडद (ब्रम्ही) येथे कायम स्वरुपी पाणी पुरवठा योजना असून योजनेतून गावाला पाणी पुरवठा करण्यात येतो. तसेच सन 2015-16 मध्ये दोन जलशुध्दीकरण यंत्र बसविण्यात आले होते. परंतु सदर दोन्ही सयंत्र सध्या बंद आहेत. ग्रामपंचायतीने सदर सयंत्रे दुरुस्तीकरीता संबंधीत पुरवठादारास अगावू रक्कम देवूनही दुरुस्तीचे काम रखडलेले आहे. या संदर्भाने ग्रामपंचायत कडून प्राप्त झालेल्या निवेदनानुसार तात्काळ पाणी पुरवठा विभागास सदर संयत्रांची पाहणी करुन दिनांक 12 जून 2022 पर्यंत संयत्रांची दुरुस्ती करुन पाणी पुरवठा सुरु करण्याचे डॉ. पांचाळ यांनी सांगितले. तत्पूर्वी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तातडीने सदर गावाला भेट देवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी एका चमूसह सदर गावाला भेट दिली. सदर टिमने गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी करुन तपासणी करीता पाण्याचे नमुने गोळा केले. हे नमुने रासायनिक तपासणीकरीता पाठविले असता पाण्यामध्ये टि.डी.एस. चे प्रमाण अल्पप्रमाणात वाढलेले असून फ्लोराईडचे प्रमाण सामान्य असल्याचे तपासणी अहवालामध्ये आढळून आलेले आहे. तरी पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांची तपासणी नियमितपणे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य सेवक यांचेद्वारे सर्वेक्षण करून किडणी आजारामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती घेतली असता सन २०१३ ते २०२२ या दहा वर्षाच्या कालावधीत एकुण बारा रुग्णांचा वैद्यकीयदृष्ट्या वेळीच योग्य उपचारा अभावी मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या सदर गावामध्ये वय वर्ष ४८ ते ६० दरम्याचे पाच रुग्ण किडणी आजारग्रस्त आहे, या रुग्णांची नियमित तपासणीकरुन योग्य उपचारासंबंधाने समुपदेश करण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी